नगर जिल्ह्यात सुमारे 25 टीएमसी पाणीसाठा, पावसाळा अवघ्या काही दिवसांवर; 13 टँकर भागवतात 19 गावांची तहान | पुढारी

नगर जिल्ह्यात सुमारे 25 टीएमसी पाणीसाठा, पावसाळा अवघ्या काही दिवसांवर; 13 टँकर भागवतात 19 गावांची तहान

नगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील धरणांमध्ये आजमितीस 24 हजार 790 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध असून, तो एकूण क्षमतेच्या 49.39 टक्के आहे. सध्या मुळा धरणात 13 हजार 126 व भंडारदरा धरणात 6 हजार 8 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा अधिक आहे. दरम्यान, 19 गावे आणि 87 वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा सुरू आहेत. त्यामुळे या टंचाईग्रस्त गावांना 13 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्ह्यात मध्यम व मोठे असे एकूण आठ धरणे आहेत. त्यांची एकूण पाणीसाठवण क्षमता 50 हजार 188 दशलक्ष घनफूट इतकी आहे. गेल्या चार वर्षांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे लहान-मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली. आजमितीस 22 मे रोजी सकाळी 6 वाजता जिल्ह्यातील 24 हजार 790 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 20 हजार 660 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता.

गेल्या वर्षी मुळा धरणात 10 हजार 451 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होता. सध्या या धरणात 13 हजार 126 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. भंडारदरा धरणात गेल्या वर्षी 4 हजार 135 दलघफू इतका पाणीसाठा होता. आजमितीस मात्र 6 हजार 8 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे.

पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. अशा परिस्थितीत भूजलपातळी टिकून आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या कमी आहे. पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये संगमनेर तालुक्यातील 8 गावे व 21 वाड्यांचा समावेश आहे. या टंचाईग्रस्त गावांतील 32 हजार 66 लोकसंख्येला 13 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

मुळा : 13126, भंडारदरा : 6008, निळवंडे : 3638, आढळा : 593, मांडओहळ : 79.10, घाटगाव : 87.19, सीना : 1077, खैरी : 181.69.

गावे, वाड्या आणि कंसात टँकरसंख्या

संगमनेर : 8-21 (7)
अकोले : 2 -11 (2)
पारनेर : 9-55 (4)

Back to top button