दिल्लीच्या रंगा-बिल्लाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत | पुढारी

दिल्लीच्या रंगा-बिल्लाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राजकारणात इतका गद्दारपणा कोणी केला नाही. मात्र दिल्लीच्या रंगा-बिल्लाने शिवसेनेच्या पाठीत पर्यायाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. शिवसेना संपवण्याचे काम ते करीत आहेत. मात्र शंभर जन्म घेतले तरी त्यांना ते शक्य नसल्याचा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी येथे घातला.

कुठली शिवसेना खरी हे चोर, दरोडेखोर ठरवणार का? ते जनताच ठरवणार, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर पराभूत होतील; पण गद्दारांमधील एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, असेही खा. राऊत म्हणाले. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आयोजित शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.

खा. राऊत म्हणाले, हिंदूहृदयसम—ाट बाळासाहेब ठाकरे यांनी 50 वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाला विचारून शिवसेनेची स्थापना केली नव्हती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील पडलेल्या ठिणगीतून तयार झालेल्या वणव्यातून ती निर्माण झाली होती. त्यामुळे ती कुणालाही विझवता येणार नाही. भविष्यात जनताच सर्जिकल स्ट्राईक करून गद्दारांना त्यांची जागा दाखवेल. भाजप हा कसबा पेठ बालेकिल्ला समजत होता. मात्र आमची शिवसेना त्यांच्यासोबत होती म्हणून ते जिंकत होते. यावेळी मुख्यमंत्री मिंधे असतानाही त्यांना बालेकिल्ला राखता आला नाही. त्यांचा बालेकिल्ला कोसळला. जनतेने त्यांच्या छाताडावर दिलेले हे पहिले पाऊल असून, ज्यांनी त्यांना खांद्यावर घेऊन प्रतिष्ठा दिली, पदे दिली तेच आता त्यांना खांद्यावर घेऊन त्यांची तिरडी काढतील.

डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले, शिवसेनेशी गद्दारी करणारा एकही आमदार किंवा खासदार येणार्‍या निवडणुकीत निवडून येणार नाही.
जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, पोपटपंची असणार्‍या खासदाराने 50 खोक्यांपेक्षा जास्त खोकी घेतल्याची टीका करीत पूर्वी आईने गद्दारी केली, आता पोरानेही केली. त्यामुळे भविष्यात त्यांच्या घरातील सदस्य ग्रामपंचायतीची निवडणूकदेखील जिंकणार नाहीत.

संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, चिन्ह असो किंवा नसो. कडवट शिवसैनिकांच्या तिजोरीवर पक्ष पुन्हा भरारी घेईल, गद्दारांना नक्की जागा दाखवतील. प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी सर्वसामान्य, कष्टकर्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

सयाजी चव्हाण यांनी स्वागत केले. महादेव गौड यांनी आभार मानले. मेळाव्यास अस्लम सय्यद, महेश बोहरा, धनाजी मोरे, अण्णासाहेब बिलुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

चोरांनी राज्य निर्माण केले : राऊत

सध्या चोरांनी राज्य निर्माण केले आहे. त्यांनी धनुष्यबाण चोरला. धनुष्यबाण सांभाळण्याची त्यांची औकात आहे का? शिवसेनेचे नाव चोरले. त्यांची लायकी आहे का? अशी टीका करीत ते चोर नाहीत हे त्यांनी सिद्ध करावे, असे आव्हानही खा. राऊत यांनी दिले. उपमुख्यमंत्र्यांना अनाजीपंतांची उपमा देत 2014, 2019 वेळी भाजपच्या धोरणात्मक निर्णयानुसार उपमुख्यमंत्री पद निर्माण करता येत नाही, असे म्हणणार्‍यांनी सध्या उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आहे. नियतीने घेतलेला तो सूड असल्याची टीकाही खा. राऊत यांनी केली.

शिंदे गटातील आमदार, खासदारांचा शेलक्या शब्दात उद्धार

संजय राऊत भाषणास उभे राहिल्यानंतर संपूर्ण नाट्यगृह घोषणांनी दुमदुमून गेले. त्याचबरोबर शिवसेनेच्या जयजयकाराबरोबर शिंदे गटातील आमदार, खासदारांचा शेलक्या शब्दात उद्धार करण्यात आला. त्याचबरोबर विद्यमान खासदारांना गद्दार उपमा देऊन नाट्यगृह घोषणांनी दणाणून सोडण्यात आले. येत्या निवडणुकीत शिवसेनेशी गद्दारी करणार्‍या सर्व आमदार, खासदारांना जनता चांगला धडा शिकवेल, असे खा. संजय राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

‘धैर्य’ या शब्दाचा अपमान

खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीका करताना खा. राऊत म्हणाले, निवडणुकीवेळी मीच खासदार म्हणून प्रचार केला होता. मात्र आता मीच गद्दार म्हणून फिरण्याची वेळ त्याच्यावर येणार आहे. पूर्वीपासूनच तो टिकणार नाही, विकला जाईल अशी खात्री होती. ती त्याने गद्दारांसोबत जाऊन खरी ठरवली. धैर्यशीलमधील ‘धैर्य’ या शब्दाचा त्याने अपमान केला असून शिवसैनिक त्याला जागा दाखवतील. आजचे वातावरण पाहून त्याला घरातून बाहेर पडण्याची भीती वाटेल, असा टोलाही खा. राऊत यांनी लगावला.

Back to top button