कोल्हापूर : तब्बल आठ दिवसानंतरही दूधगंगा नदीपात्र कोरडेच | पुढारी

कोल्हापूर : तब्बल आठ दिवसानंतरही दूधगंगा नदीपात्र कोरडेच

दत्तवाड: पुढारी वृत्तसेवा : पाटबंधारे खात्याच्या अयोग्य नियोजनामुळे गेल्या आठ दिवसानंतरही दूधगंगा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे शेतीतील फळे, भाजीपाला व इतर पिकावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संबंधित विभागाने लवकरात- लवकर नदीपात्रात पाणी सोडून शेतकरी व नागरिकांची पाण्यासाठी होणारी हेळसांड दूर करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

दूधगंगा नदीवर कोणत्याही मोठ्या योजना कार्यान्वित नसतानाही दरवर्षी जानेवारी ते मे महिन्याच्‍या कालावधीत नदी पात्र किमान तीन ते चार वेळा कोरडे पडते. या कालावधीत शेतीतील पिकांना याचा चांगलाच फटका बसतो. दूधगंगा नदी काठावरील सुळकुडपासून बारवाड, कारदगा, सदलगा, बोरगाव, मलिकवाड, एकसंबा या कर्नाटकातील व महाराष्ट्रातील कागल व शिरोळ तालुक्यातील दत्तवाड, घोसरवाड, दानवाड, टाकळीवाडी तसेच पाण्याच्या योजना असलेल्या शिवणकवाडी, अब्दुल लाट, हेरवाड आधी गावातील शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नदीपात्रात पाणी कमी झाल्यावर संबंधित गावातील ग्रामपंचायतीमार्फत पाटबंधारे खात्याला वेळीच सूचना देण्यात येतात; पण तरीही पाटबंधारे खात्याच्या अयोग्य नियोजनामुळे अद्याप नदीपात्र कोरडे पडले आहे. आता या स्थितीमुळे दूधगंगा नदीवरील कोल्हापूर थेट पाईपलाईन, गांधीनगरसह १३ गावांना मंजूर झालेली योजना, तसेच इचलकरंजीसाठी सुळकड योजना कार्यान्वित झाल्या. तर दूधगंगा नदीकाठाची अवस्था किती बिकट होईल? अशी भीती दूधगंगा नदी काठावर निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दूधगंगा नदीवर नवीन योजना कार्यान्वित होऊ द्यायच्या नाहीत असा निर्धार व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button