डोंबिवली : भगवा तलावाच्या उद्घाटनानंतर काही तासातच प्रवेशद्वार निखळले | पुढारी

डोंबिवली : भगवा तलावाच्या उद्घाटनानंतर काही तासातच प्रवेशद्वार निखळले

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी (दि.१६) सुशोभीकरण केलेल्या भगवा तलावाचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. पण महापालिकेने सुशोभीकरण केलेल्या या तलावाचे प्रवेशद्वार आज निखळले. त्यामुळे महापालिकेने निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याची टीका केली जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून काळा तलाव या नावाने ओळखला जाणारा तलाव आता भगवा तलाव म्हणून ओळखला जाणार आहे. हा तलाव सर्व सोयी सुविधांसह नागरिकांना खुला करावा, अशा सूचना वारंवार स्थानिक आमदार आणि खासदारांकडून पालिकेला दिल्या जात होत्या. त्यानंतर या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले. यासाठी सुमारे १९ कोटी रुपये खर्च आला. यातील स्मार्ट सिटीच्या अंतर्गत ३३ टक्के निधी केंद्र सरकारकडून, १६ टक्के निधी राज्य सरकारकडून तर ५० टक्के निधी महापालिकेने खर्च केला. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या तलावाचे उद्घाटन केले. मात्र आज सकाळी तलावाचे प्रवेश द्वार निखळले. या घटनेने महापालिकेच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची चर्चा शहरात रंगली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र मुख्यमंत्री आले त्यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. त्या गर्दीचा भार प्रवेश द्वारावर आल्याने प्रवेशद्वार निखळल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button