पाटस: एल. व्ही. डेअरीजच्या भागीदारांवर गुन्हा, कोटक बँकेची १८ कोटी रुपयांची फसवणूक | पुढारी

पाटस: एल. व्ही. डेअरीजच्या भागीदारांवर गुन्हा, कोटक बँकेची १८ कोटी रुपयांची फसवणूक

पाटस (पुणे), पुढारी वृतसेवा: पाटस (ता.दौंड) येथील एल. व्ही. डेअरी फार्मच्या नावाने कोटक महिंद्रा बँकेकडून १८ कोटी ४६ लाख रुपयांचे कर्ज घेऊन ते स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महेश लक्ष्मणदास दोशी, मनाली मंगेश दोशी व मिलिंद लक्ष्मणदास दोशी ( सर्व रा. पाटस ता.-दौंड) अशी त्यांची नावे असल्याची माहिती माहिती यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे . या प्रकरणाची फिर्याद येरवडा येथील कोटक महिंद्रा बँक शाखेचे मुख्याधिकारी यांनी यवत पोलिसांना दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश लक्ष्मणदास दोशी, मिलिंद लक्ष्मण दोशी आणि कुटुंबातील महिला यांनी कट करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बँकेस खोटी माहिती व बनावट कागदपत्रे तयार करून कोटक महिंद्रा बँक, पुणे शाखेकडून एकूण १८ कोटी ४६ लाख 2 हजार ३८७ रुपये एल. व्ही. डेअरी, पाटस फर्मच्या व्यवसायासाठी कर्ज म्हणून घेतले. २५ डिसेंबर २०१५ पासुन ते २७ ऑगस्ट २०२२ पर्यत हे कर्ज घेऊन ते डेअरी फार्म व्यवसायासाठी न वापरता दोशी भागीदारांनी या रक्कमेची फसवणूक केली असल्याने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे करीत आहेत

Back to top button