औरंगजेबाच्या हातात हात घालून इंडिया आघाडीचे सत्तेचे स्वप्न | पुढारी

औरंगजेबाच्या हातात हात घालून इंडिया आघाडीचे सत्तेचे स्वप्न

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मतपेढीच्या राजकारणासाठी छत्रपती शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या हातात हात घालून सत्ता मिळविण्याचे स्वप्न इंडिया आघाडी पाहते आहे. एवढेच नव्हे तर वारसा हक्काने मिळणार्‍या मालमत्तेवर कर लावून त्यावर डल्ला मारण्याचे व तुष्टीकरणासाठी मागासवर्गीय आणि ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे कारस्थान करणार्‍यांचा फुटबॉलच्या भाषेत चारीमुंड्या चीत करणारा गोल करा आणि काँग्रेससह त्यांच्या मित्र पक्षांची छत्रपती शिवरायांच्या या भूमीतून पराभवाची सुरुवात करा. पहिल्या दोन टप्प्यांत भाजप आघाडी 2-0 ने पुढे आहे. आता जबाबदारी कोल्हापूरकरांची आहे, अशी भावनिक साद घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना विजयी करण्याचे आवाहन शनिवारी केले.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवन मैदानावर जाहीर सभा झाली. त्यावेळी मोदी यांनी काँगे्रस नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला नेस्तनाबूत करण्याचे आवाहन केले. सभेला एवढी प्रचंड गर्दी झाली होती की, सभा संपली तरी अनेकांना सभास्थळी प्रवेश मिळू शकला नाही.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या तुष्टीकरण आणि मतपेटीच्या राजकारणावर तुफानी हल्ला चढविताना मोदी म्हणाले, आजवर त्यांनी अनेक स्वप्ने बघितली. आता ही स्वप्ने सत्यात उतरत नाहीत याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी देशविरोधी आणि द्वेषभावना पसरविणार्‍या मुद्द्यांचा आधार घेतला आहे. याच आधारावर ते राजकारण पुढे नेत आहेत. गरिबांच्या विरोधी आणि मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्यावरही आता त्यांचा डोळा आहे. दिशाहीन काँग्रेस आणि कोणतीही दृष्टी नसलेले त्यांचे मित्रपक्ष यांनी आता भाजपला विरोध म्हणून वेगळा सूर लावला आहे. त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी विकासाचे मुद्दे उपस्थित केले. पण या मुद्द्यावर भाजपने चोख उत्तर देताच आता आपला टिकाव लागत नाही हे लक्षात घेऊन त्यांनी आपली रणनीती बदलली.

आता ते उघडपणे देशविरोधी तुष्टीकरणाचा वापर करीत आहेत. एवढेच नव्हे तर काँग्रेसने आमची सत्ता आली तर काश्मीरमध्ये 370 कलम पुन्हा आणण्याची घोषणा केली आहे. जे कलम मोदींनी रद्द केले ते कलम पुन्हा लागू करण्याची हिंमत या देशात कोणाच्यातही नाही आणि भारतीय जनता ते कधी होऊही देणार नाही. हा तुमचा विश्वास घेऊन मी पुढे जात आहे. काँग्रेसवाले एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर त्यांना सीएए रद्द करायचे आहे. ही परिस्थिती तुम्ही येऊ देणार? असल्या देशविरोधी आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला साथ देणार? असा सवाल करीत मोदी म्हणाले, या भारतात हे कदापिही होणार नाही. भारतीय जनता त्यांचे मनसुबे उधळून लावल्याशिवाय राहणार नाही.

देशात आमचे सरकार येईल असे स्वप्न बघणारे काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हे तीन अंकी संख्याही गाठू शकणार नाहीत. सरकार स्थापनेचे स्वप्न सोडाच; सरकारच्या दरवाजापर्यंत जनता त्यांना पोहोचू देणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करून नरेंद्र मोदी म्हणाले, सरकार स्थापन करण्याचे मनसुबे रचणार्‍या इंडिया आघाडीने आता सरकारचा फॉर्म्युला तयार करायला घेतला आहे. हा फॉर्म्युला कसला तर पाच वर्षांत पाच पंतप्रधान देण्याचा. हे तुम्ही होऊ देणार का, असा सवाल त्यांनी केला.

कर्नाटक फॉर्म्युला लादण्याचा डाव

कर्नाटकात हाच फॉर्म्युला ते वापरत आहेत. पहिली अडीच वर्षे एक मुख्यमंत्री. आता असलेले उपमुख्यमंत्री हे पुढचे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असा फॉर्म्युला त्यांनी रचला आहे. यापूर्वी छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये हाच फॉर्म्युला वापरला. त्यामुळे विकासाचा द़ृष्टिकोन असलेली जनता पाच वर्षांत पाच पंतप्रधान देणार्‍यांचे स्वप्न सहन करणार नाही, असे स्पष्ट आव्हान पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिले.

भरकटलेल्या विरोधकांना कोणती दिशा सापडलेली नाही. त्यामुळे आता दक्षिण भारत तोडण्याची भाषा ते करीत आहेत. दक्षिण भारत तोडून वेगळा देश स्थापन करण्याची भाषा त्यांनी सुरू केली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतील अहद पेशावर तहत तंजावर या भूमिकेशी विपरीत आणि देश तोडण्याची भाषा करणार्‍या काँग्रेसच्या अजेंड्याला जनता कधीही स्वीकारणार नाही. छत्रपती शिवरायांच्या भूमीतून ही जी घोषणा झाली, त्याला तेवढेच तगडे उत्तर या महाराष्ट्राने दिले पाहिजे. त्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे मोदी म्हणाले.

राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने धुडकावले

पाचशे वर्षे वाट पाहिल्यानंतर राम मंदिराची उभारणी झाली. लाखो लोकांच्या उपस्थितीत राम मंदिराचे लोकार्पण झाले. राम मंदिराचे ट्रस्टी हे चांगले लोक आहेत. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना घरी जाऊन राम मंदिराच्या लोकार्पणाला हजर राहण्याचे दिलेले निमंत्रण त्यांनी धुडकावले. प्रभू रामांचे निमंत्रण धुडकावणार्‍या काँग्रेसने स्वतः आरशात डोकावून पाहिले पाहिजे. कारण ज्या अन्सारी कुटुंबाने राम मंदिराच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढली, दोन पिढ्या ते लढत राहिले. मात्र न्यायालयाचा निकाल येताच तो मान्य करून अन्सारी कुटुंबीयांच्या दुसर्‍या पिढीचे प्रतिनिधी राम मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्याला उपस्थित राहिले. एका बाजूला राम मंदिराला न्यायालयात विरोध करणार्‍या अन्सारी कुटुंबीयांची उपस्थिती आणि दुसर्‍या बाजूला घरी जाऊन दिलेले राम मंदिराच्या लोकार्पणाचे निमंत्रण ठोकरणारे काँग्रेसवाले याचा विचार तुम्हीच करा आणि राम मंदिराचे निमंत्रण ठोकरणार्‍यांचे काय करायचे याचा निर्णय तुम्हीच घ्या, असे आवाहनही मोदी यांनी केले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना

आता तर सनातन धर्माला हिणवण्याची नवी चाल खेळली जात आहे. इंडिया आघाडीचे खासमखास डीएमके पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रात बोलवून शिवछत्रपतींच्या भूमीत त्यांचा सन्मान केला जात आहे. मात्र या डीएमके नेत्यांची भाषा काय तर सनातन धर्म म्हणजे डेंग्यू आहे, मलेरिया आहे. त्यांचा सन्मान केल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील हे लक्षात घ्या. या मतपेटीच्या आणि तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी काय काय सहन करायचे याचा निर्णय घेण्याची ही निवडणूक असल्याचे मोदी म्हणाले.

तुमची संपत्ती लुटू देणार काय?

आता तर तुम्ही आयुष्यभर कष्ट करून कमवलेली संपत्ती वारसाकडे देत असताना त्यावर कर लावण्याची भाषा काँग्रेस नेत्यांनी सुरू केली आहे. कष्ट तुम्ही करायचे. मुलाबाळांसाठी तुम्ही संपत्ती मिळवायची आणि ती आपल्या हयातीनंतर मुलाबाळांकडे जात असताना त्यावर कर रूपाने डल्ला मारण्याची भाषा काँग्रेस नेते करीत असतील तर त्यांचे काय करायचे हे तुम्हीच ठरवा. तुमचे घर, तुमची कार, तुम्ही मिळविलेले सोने, चांदी, तुमच्या मुलाबाळांकडे जाण्यापासून रोखली जाणार असेल, त्यावर वारसा कर आकारला जाण्याची भाषा काँग्रेसकडून केली जाणार असेल तर पै पै करून मिळविलेल्या संपत्तीला तुम्ही लुटू देणार का याचा निर्णय घेण्याचे आवाहनही मोदी यांनी केले.

कर्नाटकात मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण

महाराष्ट्र ही आंबेडकर, शाहू, फुले यांची भूमी आहे. त्यांच्याच भूमीतून सामाजिक न्यायाची हत्या करण्याचे कारस्थान रचले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणार्‍या काँग्रेसला आता एसटी, एससी आणि ओबीसी यांचे आरक्षण संपवायचे आहे. कर्नाटकात लेखनीच्या एका फटकार्‍यासरशी मुस्लिमांचा समावेश ओबीसीत करण्यात आला. ओबीसींचे 27 टक्के आरक्षण संपविण्याचे कारस्थान रचले. ओबीसींचे 27 टक्के आरक्षण लुटून देण्याचा निर्णय तुम्ही घेणार का, असा सवाल मोदी यांनी केला.

2012 साली तेव्हाच्या आघाडी सरकारने मागच्या दाराने ओबीसींचे आरक्षण संपविण्यासाठी घटना बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करून मोदी म्हणाले, ओबीसींच्या हक्कांचे रक्षण झाले पाहिजे. काँग्रेसचे धोरण एकच आहे ते म्हणजे सरकार बनवा आणि नोट कमवा या धोरणाला हाणून पाडा, असे आवाहनही केले.

विकासाला मते द्या

गेल्या दहा वर्षांत देशाच्या प्रगतीचा आढावा घेताना मोदी म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. आज भारत हा स्टार्टअपमध्ये जगात तिसरा आहे. मोबाईलच्या उत्पादनात भारत जगात दुसरा आहे. युवकांना नोकरीच्या जंजाळात न अडकविता त्यांना स्वावलंबी करण्याचे धोरण आखले. त्याचे फायदे दिसत आहेत. म्हणूनच मुद्रा योजनेतून आता दहा लाख रुपयांऐवजी वीस लाख रुपयांचे विनाहमी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षांत महिलांची भागीदारी सर्व क्षेत्रात वाढली आहे. नवे रोजगार आणि संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. ज्या सहकारी क्षेत्राने या महाराष्ट्राच्या भूमीत मोठे बदल घडविले त्या सहकारी क्षेत्राच्या प्रगतीसाठी भारत सरकारने सहकार मंत्रालय सुरू केले, असे सांगून विकासाला मते देण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘जगात भारी आम्ही कोल्हापुरी’; नरेंद्र मोदींकडून दोनवेळा घोषणा

काँग्रेस आघाडीला चारी मुंड्या चीत करा, असे आवाहन करताना कोल्हापूर आणि फुटबॉल हे अनोखे नाते आहे, हा नेमका धागा पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर हे फुटबॉल हब आहे, अशी भाषणाची सुरुवात केली. कोल्हापूरच्या तरुणांत फुटबॉलची लोकप्रियता प्रचंड असल्याचे सांगून ते म्हणाले, आज मी फुटबॉलच्या भाषेत तुमच्याशी संवाद साधणार आहे. दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी 2-0 गोलने आघाडीवर आहे. आता तिसर्‍या टप्प्यात जबाबदारी कोल्हापूरची आहे. महाराष्ट्राची आहे. हा गोल असा करा की, काँग्रेस आणि त्यांची आघाडी चारी मुंड्या चीत झाली पाहिजे. देशविरोधी आणि तुष्टीकरणाच्या राजकारणात काँग्रेस आघाडीने सेल्फ गोल केला आहे, अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांची खिल्ली उडविली आहे. संपूर्ण जगात कोल्हापूरची ओळख ही ‘जगात भारी कोल्हापुरी’ अशी घोषणा त्यांनी दोनवेळा दिली. यावेळी उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.

जय भवानी जय शिवाजी

‘भारतमाता की जय’ अशी तीन वेळा तर ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी दोनवेळा घोषणा देऊन नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची मराठीतून सुरुवात केली. करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाई चरणी मी वंदन करतो, असे ते म्हणाले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या या आदर्श भूमीवर आणि या महापुरुषांच्या चरणी आपण नतमस्तक आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कोल्हापुरी भेटवस्तूंनी गौरव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबाबाईची मूर्ती देऊन, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रामाची मूर्ती देऊन, संजय मंडलिक यांनी सेंद्रिय गूळ तर धैर्यशील माने यांनी संत बाळूमामा यांची मूर्ती देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला. यावेळी मोदी यांना कोल्हापुरी फेटा बांधण्यात आला. संपूर्ण सभा होईपर्यंत हा फेटा त्यांनी कायम ठेवला.

तीन कोटी महिला लखपती दीदी

महिलांची भागीदारी सर्वच क्षेत्रांत वाढल्याचे सांगून नरेंद्र मोदी यांनी ज्या क्षेत्रात महिलांना बंदी होती, त्या सर्व क्षेत्रात महिलांना संधीची दारे भाजप सरकारने उघडून दिल्याचे सांगितले. दहा वर्षांत दहा कोटी महिलांच्या बचत गटांना हजारो कोटी रुपयांचा पतपुरवठा केल्याचे सांगून मोदी यांनी तीन कोटी महिला लखपती दीदी होणार आहेत. या नारीशक्तीचा गौरव करत आहोत. कारण याच नारीशक्तीने नरेंद्र मोदी यांच्या भोवती सुरक्षेचे कवच उभारले आहे, अशा शब्दांत महिला संघटनांच्या कार्याचा मोदी यांनी गौरव केला.

काशी ते करवीर काशी

आपण काशीचे खासदार आहोत. त्या नात्याने काशीहून थेट आलो आहोत आणि तेही या करवीर काशी या क्षेत्री आलो आहोत, असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात करून उत्तर आणि दक्षिण काशीचे असलेले महत्त्व अधोरेखित केले.

माझी भेट घरोघरी न्या; त्यांचा आशीर्वाद मला पोहोचवा

माझे व्यक्तिगत तुमच्याकडे काम असल्याची भावनिक साद घालत भाषणाच्या समारोपात मोदी म्हणाले, येथून गेल्यानंतर तुम्ही घरोघरी जा. नरेंद्र मोदी कोल्हापुरात आले होते. त्यांनी तुम्हाला नमस्कार सांगितला आहे, असे त्यांना सांगा आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे तुम्ही आता घोषणा देत असलेले मोदी सरकार सत्तेवर येईल. त्यासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणा.

29 मिनिटांच्या भाषणात मोदींचा विरोधकांवर चौफेर हल्ला

सायंकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिले आणि 6 वाजून 35 त्यांनी आपले भाषण पूर्ण केले. या 29 मिनिटांच्या भाषणात त्यांनी विरोधकांवर चौफेर हल्ला चढविला. इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर त्यांच्या टीकेचा रोख होता.

Back to top button