कोल्हापूर : थेट पाईपलाईनला आता मुदतवाढ नको | पुढारी

कोल्हापूर : थेट पाईपलाईनला आता मुदतवाढ नको

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा करणारी योजना 2014 साली सुरू झाली, ती अद्याप पूर्ण झालेली नाही. दरवेळी त्याला मुदतवाढ दिली जाते. मात्र, यापुढे ठेेकेदाराला मुदतवाढ देऊ नका. अंतिम मुदतवाढ देऊन त्या तारखेपर्यंत काम पूर्ण करून घ्या, अशा शब्दांत प्रशासनाला ठणकावत ‘वेट अँड सी’ प्रशासन आपल्याला नको; तर ‘अ‍ॅक्टिव्ह’ प्रशासन हवे असल्याचे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात शिंदे यांनी केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. पाहतो, करतो, हे चालणार नाही. कामे कधी पूर्ण करणार ते लिहून द्या, असे सांगत प्रत्येक कामाची डेडलाईन त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना लिहून घ्यायला सांगितली.

थेट पाईपलाईन योजना रखडल्याबाबत त्यांनी महापालिका अधिकार्‍यांना सुनावले. आपण त्यावेळी नव्हतो, अशी प्रशासनाने दिलेली उत्तरे आता चालणार नाहीत. दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करून घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात कृषी व महसूल विभागाच्या वादात ‘पीएम किसान’च्या 72 हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, याबाबत शिंदे यांनी केंद्र सरकारच्या योजनेत नागरिकांना येणार्‍या अडचणी दूर करा, अडचणी सांगत बसू नका. तुम्ही लोकांपर्यंत जा, असे सांगत सर्व योजनांची जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ मिळाला पाहिजे. या द़ृष्टीने काम करा, असेही सांगितले.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, भाजप शहराध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

एकाच रस्त्याची दोनवेळा खोदाई का?

अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी व ड्रेनेजसाठी एकाच रस्त्याची दोनवेळा खोदाई का करता, असा सवाल करत स्वतंत्रपणे रस्ते न खोदता दोन्ही कामांसाठी एकाचवेळी रस्ते खोदाई करून काम पूर्ण करा. रस्ते खोदाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, असेही शिंदे यांनी सांगितले.

Back to top button