अग्निशमन दलात शिडी धरायलाही माणूस नाही | पुढारी

अग्निशमन दलात शिडी धरायलाही माणूस नाही

कोल्हापूर; डॅनियल काळे : महापालिकेचा अग्निशमन दलच विविध कसरती करत कसाबसा चालवला जात आहे. अपुरे कर्मचारी, अपुरी साधने याचा सामना करत थोडके कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत.

एखादी वर्दी आली की, एका फायर फायटरची गरज असताना केवळ जादा मनुष्यबळ मिळावे, यासाठी विविध ठिकाणांवरून 3 फायर फायटर घटनास्थळी दाखल केल्या जात आहेत. एका फायर फायटर वाहनावर 7 कर्मचार्‍यांची आवश्यकता असते. प्रत्यक्षात मात्र चालकासह 3 माणसे उपलब्ध होत असल्याने शिडी धरायलाही अग्निशमन दलाकडे कर्मचारी उपलब्ध नाही. त्यामुळे तीन वाहने बोलवावी लागतात. एखादी मोठी घटना घडली तर खरच ही यंत्रणा टिकेल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सर्वच विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे. अग्निशमन दलही त्याला अपवाद नाही. परंतु हा विभाग आपत्तीत सेवा देणारा विभाग आहे. त्यामुळे येथे कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. पण नेमक्या याच बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. एखादी मोठी वर्दी आली की, त्याठिकाणी संपूर्ण अग्निशमन दलालाच पळवावे लागत आहे. रात्रपाळी करून नुकतेच घरी गेलेल्या कर्मचार्‍यांना सुद्धा अशा बिकट प्रसंगात पुन्हा कामावर यावे लागते. अत्यावश्यक सेवेचा भाग असणार्‍या अग्निशमन दलाची ही अवस्था असेल तर इतर व्यवस्थेबद्दल न बोललेच बरे. असाच काहीसा अनुभव महापालिकेचा आहे.

12 कोटींच्या गाडीला प्रशिक्षित चालकच नाही

शहरात आता बहुमजली इमारती होत आहेत. अशा ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर तेथे पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाने 12 कोटी रुपयांची टर्न टेबल लॅडर ही गाडी जपान येथून घेतली आहे. या गाडीवर प्रशिक्षित असा स्टाफ लागतो. त्याच्या चालकालाही स्वतंत्र प्रशिक्षण द्यावे लागते, पण अद्याप तसा प्रशिक्षित स्टाफ महापालिकेकडे नाही. काही कर्मचार्‍यांना आता बेंगलोर येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ठोक मानधनावरील कर्मचार्‍यांची नियुक्ती करा

अग्निशमन दलात ठोक मानधन तत्त्वावर काम करणारे कर्मचारी कमी पगारात अत्यंत चांगली सेवा बजावत आहेत. 2019, 2021 च्या महापुरातही जीवाची बाजी लावून या कर्मचार्‍यांनी काम केले आहे. त्यामुळे याच कर्मचार्‍यांची रिक्त जागावर नियुक्ती करावी, असा ठराव शासनाकडे पाठविला आहे, पण त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. या कर्मचार्‍यांना न्याय देण्याची भूमिका महापालिका व राज्य शासनाने घ्यायला हवी. इतर शहरात ठोक मानधनावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांची नियुक्ती कायम कर्मचारी म्हणून केली आहे.

फायरमनची 81 पदे रिक्त

अग्निशमन दलात फायरमन हे पद महत्त्वाचे आहे. या पदाच्या 81 जागा रिक्त आहेत. एकूण 108 जागा या पदाच्या आहेत. यापैकी केवळ 27 जागा भरल्या आहेत. त्यामुळे महत्त्वाचे असणार्‍या फायरमनच्या पाच जागा रिक्त आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी आदींच्याही जागा रिक्त असून महापालिकेने तातडीने या जागा भरण्याची गरज आहे.

Back to top button