कोल्हापूर : लग्नानंतर दागिन्यांसह दोन नववधूंचा पोबारा | पुढारी

कोल्हापूर : लग्नानंतर दागिन्यांसह दोन नववधूंचा पोबारा

कुरुंदवाड, पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड येथील दोन युवकांशी लग्नानंतर 5 दिवस नांदून दोन्ही नववधूंनी सोन्याच्या दागिन्यांसह पोबारा केला. याप्रकरणी एजंट आई-वडिलांसह 9 जणांच्या टोळीविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. युवतीशी खोटे लग्न लावून दोन युवकांची फसवणूक झाल्याने कुरुंदवाडसह परिसरात खळबळ उडाली आहे.

सोन्याच्या दागिन्यांसह 4 लाख, 40 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद अविनाश घारे (वय 35) आणि विकास मोगणे (35, दोघे रा. कुरुंदवाड) यांनी दिली आहे. याप्रकरणी एजंट वर्षा जाधव (रा. सुलतानगोदे, ता. खानापूर), संध्या सुपणेकर (रा. माळवाडी, ता. पलूस, जि. सांगली), नवरी शारदा ज्ञानबा दवंड, तिचे वडील ज्ञानबा रामचंद्र दवंड (रा. हडपसर, ता. हवेली, जि. पुणे), संतोष ज्ञानदेव सुतार (रा. मदनवाडी, ता. इंदापूर), जगदीश बजरंग जाधव (रा. सुलतानगोदे, ता. खानापूर, जि. सांगली), नवरी अर्चना सिद्धेश्वर वाघमारे, तिची आई श्रीमती रेखा सिद्धेश्वर वाघमारे (रा. आदर्शनगर, गणपती मंदिराजवळ, विश्रांतवाडी, जि. पुणे), सुवर्णा अमोल बागल (रा. भोसरी, पुणे) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

कुरुंदवाड येथील अविनाश घारे आणि विकास मोगणे या युवकांचे लग्न जमविण्याचे काम एजंट वर्षा जाधव हिने केले. माझा हा व्यवसाय असून त्या बदल्यात मला पैसे द्यावे लागतील, असे तिने सांगितले. त्यामुळे घारे आणि मोगणे कुटुंबीयांनी एजंट जाधव आणि त्यांच्या 9 जणांच्या टोळीच्या मागणीनुसार पैसे दिले. 31 ऑक्टोबर रोजी कुरुंदवाड येथे या तरुणांचा विवाह झाला.

शारदा दवंड हिच्याशी अविनाश घारे याचे लग्न लावून देण्यासाठी 1 लाख, 80 हजार रुपये घेतले. नवरी मुलीला मणीमंगळसूत्र व अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लग्नावेळी घारे कुटुंबीयांनी घातले होते. लग्न झाले अन् पाचव्या दिवशी सोन्याच्या दागिन्यांसह नववधू शारदा दवंड ही माहेरी गेली ते परत आलीच नाही.2 लाख, 80 हजारांची फसवणूक झाल्याचे घारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

विकास मोगणे याने फिर्यादीत म्हटले आहे की, वर्षा जाधव हिने अर्चना वाघमारे हिच्याशी लग्न लावून देण्यासाठी 1 लाख, 60 हजार रुपये घेतले. नववधूला सोन्या मणीमंगळसूत्र, चांदीचेे पैंजण व जोडवी असे 40 हजारांचे दागिने घातले होते. दागिन्यांसह 5 दिवस नांदून ती माहेरी गेली ते परत आलीच नाही. त्यामुळे आपली 2 लाखांची फसवणूक झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button