कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी भानामतीचे प्रकार | पुढारी

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी भानामतीचे प्रकार

बामणी, पुढारी वृत्तसेवा : बामणी येथे रविवारी (दि.१५) होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर सध्या भानामतीचे प्रकार सुरू आहेत. असाच प्रकार करण्याच्या तयारीत असणाऱ्या संशयित परप्रांतीय साधूंना बामणी येथील तरुणांनी पिटाळून लावले. करणी व भानामतीच्या उद्देशाने हे साधू गावात आले असल्याच्या संशयामुळे बामणी गावांमध्ये वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी बामणी गावांमध्ये एका बुलेरोमधून साधूच्या वेशातील चार व्यक्ती गावातील एका उमेदवाराचा पत्ता विचारत आले. पत्ता विचारून त्या उमेदवाराच्या घराच्या दिशेने निघून गेले असता याची माहिती गावातील तरुणांना समजली. गावातील तरुनाणी त्या गाडीचा पाठलाग करत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर प्रकार त्यांच्या लक्षात येताच गाडीतील हे चार भोंदू व्हनाळीच्या दिशेने निघून गेले.

मात्र, व्हनाळीजवळ पोलिसांची गाडी बघून ही गाडी परत बामणीकडे आली. त्यावेळी मुख्य रस्त्यावर थांबलेल्या काही तरुणांनी ही गाडी अडवली. गाडी अडवून त्यांची आक्रमकपणे चौकशी करून चांगलेच फैलावर घेतले. हे लोक हिंदीमध्ये बोलत होते. आपण रामेश्वरच्या यात्रेसाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर तरुणांनी रामेश्वर आम्हाला माहिती आहे. चुकीची माहिती सांगू नका,असा दम दिला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

हेही वाचलंत का?

Back to top button