Cristiano Ronaldo : रोनाल्डोने गाठले रिअल मद्रिदचे मैदान! क्लबशी करार झाल्याची चर्चा | पुढारी

Cristiano Ronaldo : रोनाल्डोने गाठले रिअल मद्रिदचे मैदान! क्लबशी करार झाल्याची चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ अनपेक्षितरित्या बाहेर पडला. या निराशाजनक कामगिरीनंतर चाहते नाराज झाले आहेत. दरम्यानच्या काळात रोनाल्डोने इंग्लिश क्लब मॅन्चेस्टर युनायटेडला सोडचिठ्ठी देत सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे आता तो कुठल्या क्लबकडून फुटबॉलच्या मैदानात खेळताना कधी दिसेल याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच एक सुखावणारे वृत्त समोर आले आहे. रोनाल्डो हा चक्क त्याचा जुना क्लब रियल मद्रिदच्या मैदानावर पोहोचला आहे.

रोनाल्डो (Cristiano Ronaldo) रिअल माद्रिदच्या मैदानावर सराव करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मँनचेस्टर युनायटेड क्लबशी असलेला करार संपुष्टात आणल्यानंतर तो नवीन क्लबच्या शोधात आहे. परंतु, रोनाल्डो रिअल मद्रिदच्या मैदानावर पोहचण्या पाठीमागचे कारण वेगळे आहे.

रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) रिअल मद्रिद संघातील जुन्या सहका-यांपासून अंतर ठेवून वेगळ्या प्रशिक्षण मैदानावर सराव करताना दिसला. तो नुकताच मँचेस्टर युनायटेड क्लबपासून परस्पर संमतीने वेगळा झाला आहे. त्याने एका मुलाखतीत मँचेस्टर युनायटेड क्लब आणि प्रशिक्षक एर्ट टेन हेग यांच्यावर टीका केली होती. एका मुलाखतीत त्याने गंभीर आरोप करून खळबळ माजवली होती. त्यानंतर मँचेस्टर युनायटेड क्लब आणि प्रशिक्षक एर्ट टेन हेग विरुद्ध रोनाल्डो असा वाद उफाळला. अखेर रोनाल्डोने स्वत: क्लबपासून फारकत घेत वादावर पडदा टाकला.

कतार येथील विश्वचषक स्पर्धा ही रोनाल्डोची ही शेवटची जागतिक स्पर्धा असून तो विजेतेपद पटकावेल असा विश्वास चाहत्यांना होता. पण तसे काही घडले नाही. रोनाल्डोला मोकळ्या हाताने घरी परतावे लागले. दरम्यान, या अपयशानंतर रोनाल्डोच्या पुन्हा राष्ट्रीय संघासाठी मैदानात उतरणार की नाही यावर उलटसुलट बातम्या समोर आल्या. पण ने CR7 ने स्वत: यावर मौन सोडत भाष्य केले. मी 2024 ची युरो स्पर्धा खेळेन आणि त्यानंतर निवृत्तीबाबत पुढचा विचार करीन, अशी भावना व्यक्त केली.

रिअल मद्रिदशी चांगले संबंध

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डोसोबत त्याचा मोठा मुलगा १२ वर्षीय ख्रिस्तियानो ज्युनियर देखील आहे. रोनाल्डो रिअल माद्रिदच्या प्रशिक्षण केंद्रात गेल्यानंतर, तो क्लबमध्ये पुन्हा साइन इन करू शकतो अशा बातम्या आल्या होत्या. परंतु, याबाबत दोघांनीही अधिकृत माहिती दिलेली नाही. रोनाल्डो आणि रिअल माद्रिद यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्याला प्रशिक्षण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

२००९ ते २०१८ या काळात रिअल मद्रिदच्या संघात

सध्या रोनाल्डोकडे यूएईमधील क्लब अल नासेरची ऑफर आहे. दरम्यान रोनाल्डोने नासेर क्लबशी हात मिळवणी केली आहे, अशा बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. पण त्या अफवा निघाल्या. कारण स्वत: रोनाल्डोने स्पष्टीकरण देत मी हा क्लब जॉईन केलेला नाही असे जाहीर केले. रोनाल्डो 2009 ते 2018 या काळात मद्रिदकडून खेळला. त्याने क्लबसाठी 438 सामन्यांत 450 गोल केले असून 4 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात मोठा वाटा उचला आहे..

हेही वाचा;

Back to top button