Kane Williamson : विल्यमसनचा राजीनामा, ‘हा’ असेल न्यूझीलंडचा नवा कसोटी कर्णधार! | पुढारी

Kane Williamson : विल्यमसनचा राजीनामा, ‘हा’ असेल न्यूझीलंडचा नवा कसोटी कर्णधार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : केन विल्यमसनने (Kane Williamson) न्यूझीलंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. नुकताच त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असून याबाबत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. विल्यमसनच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी हा न्यूझीलंड कसोटी संघाच्या कर्णधार पदी विराजमान झाला आहे. बोर्डाने एकमताने त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली असून तो अगामी पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी मालिकेपासून संघाचे नेतृत्व करेल.

विल्यमसन (Kane Williamson) हा वनडे आणि टी 20 संघाच्या कर्णधारपदी कायम राहणार असून कर्णधारपदाचा राजीनाम्यानंतर तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळण्याची त्याने इच्छा व्यक्त केली आहे. विल्यमसन म्हणाला, कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व करणे ही सन्मानाची बाब आहे. माझ्यासाठी कसोटी सामने हे क्रिकेटचे शिखर आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचा मला अभिमान आहे. कर्णधारपदाची धुरा संभाळताना मैदानावर आणि इतर वेळीही कामाचा व्याप वाढतो. करियरच्या या टप्प्यात हा निर्णय घेणे माझ्यासाठी योग्य आहे.

टीम साऊदीच्या नेतृत्वाबद्दल बोलताना विल्यमसनने, मी त्याला सर्वतोपरी सहकार्य करेन. त्याच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. न्यूझीलंड संघाला तो नक्कीच यश मिळवून देईल, अशी भावना व्यक्त केली. साऊदीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकूण 346 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील 22 टी-20 सामन्यात त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. साऊदी हा न्यूझीलंडचा 31 वा कसोटी कर्णधार असेल. (Kane Williamson)

हेही वाचंलत का?

Back to top button