राजेंद्रनगर गँगवॉर : हम ठोकते पहले है, सोचते बाद में!; सोशल मीडियावरून मेसेज वॉर : खाकीचा वचक आवश्यक | पुढारी

राजेंद्रनगर गँगवॉर : हम ठोकते पहले है, सोचते बाद में!; सोशल मीडियावरून मेसेज वॉर : खाकीचा वचक आवश्यक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : इरादे खतरनाक है हमारे. अगर बच गया तो तेरी किस्मत… आताच तर मी बदलायला सुरुवात केली आहे, बदला बाकी आहे… नडताना शंभरवेळा विचार करा… आम्ही ठोकताना एकदाही विचार करत नाही, अशा मेसेजमधून गुन्हेगार एकमेकांना खुले आव्हान देत आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस्अ‍ॅपवर सुरू असलेले हे सोशल वॉर पोलिसांना का दिसत नसावे, हा सवाल उपस्थित होत आहे.

राजारामपुरीत एकेकाळी आर. सी. गँग विरुद्ध भास्कर गँगमध्ये भडका उडाला होता. पुढे एस.टी. गँगचा शिरकाव होऊन सर्वच भाग अशांत बनला होता. काही दिवसांपूर्वीच चिन्या हळदकर या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. गर्दी, मारामारी, खंडणी, जीवघेणे हल्ले हे प्रकार पुन्हा राजारामपुरीमध्ये फोफावत आहेत.

गुन्हेगारांचे खुले आव्हान

गुन्हेगारांशी संबंधित चित्रपटांतील डायलॉगवरून स्वत:चे व्हिडीओ, स्टेटस या गुन्हेगारांकडून बनवले जात आहेत.
पांढरे कपडे, महागडे मोबाईल, बुलेट, आलिशान मोटारी इतकेच काय, तर मैत्रिणींनाही सोबत घऊन रिल्स बनविण्याचे फॅड या गुन्हेगारांत रुजले आहे. असे व्हिडीओ बनवताना आपण भररस्त्यात थांबून वाहतुकीला अडथळा निर्माण करतो याचेही भान त्यांना उरलेले नाही.

झोपडपट्ट्यांमध्ये पुन्हा गुन्हेगारी

पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या झोपडपट्ट्यांमध्येही खुलेआम अवैध व्यवसाय सुरू असल्याचे भयावह चित्र होते. पण पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस निरीक्षक मा. शा. पाटील, अमृत देशमुख यांच्यासारख्या अधिकार्‍यांनी गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले. यादवनगर, सुभाषनगर, नेहरूनगर, राजेंद्रनगर, मोतीनगर या भागांतील गुन्हेगारी संपविण्यासाठी यापूर्वी खाकीची ताकद दिसली आहे. पुन्हा एकदा अशाच पद्धतीने येथील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याची भूमिका आता पोलिसांना घ्यावी लागणार आहे.

सायबर सेलचे दुर्लक्ष?

सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी कोणताही आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये यासाठी पोलिस दलातील सायबर सेल विभागाचे सर्वांवर लक्ष असते. पण गुन्हेगारांकडून यंत्रणेला दिले जाणारे हे आव्हान सायबर सेलच्या निदर्शनास का येत नसावे, असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. गुन्ह्यांच्या जुन्या पद्धती संपून आता अनेक सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले असताना झोपलेली ही सायबर सेल यंत्रणा आता तरी जागी होणार का, हा असा प्रश्न आहे.

Back to top button