कोल्हापूर : मंडळाचे साहित्य आणताना तरुणाचा अपघातात मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : मंडळाचे साहित्य आणताना तरुणाचा अपघातात मृत्यू

बिद्री : उंदरवाडी (ता. कागल) येथील गणेश मंडळाचे साहित्य आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. दुचाकी बोरवडे येथे देवालयाच्या कठड्याला धडकून तो जागीच ठार झाला तर एकजण जखमी झाला.

संदीप साताप्पा इंदूलकर (वय 30) असे मृताचे नाव असून ओंकार संभाजी पोवार (21) असे जखमीचे नाव आहे. संदीप व ओंकार हे गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे साहित्य आणण्यासाठी कोल्हापूरला गेले होते.

गुरुवारी रात्री पावणेअकराच्या दरम्यान बोरवडे गावच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या म्हसोबा मंदिराच्या कठड्याला त्यांच्या दुचाकीची जोरात धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, ते दोघेही दुचाकीसह अंदाजे 50 फूट अंतरावर जाऊन पडले.

यामध्ये संदीप याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी ओंकारला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

जि. प. सदस्य मनोज फराकटे, उंदरवाडीचे सरपंच संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. मुरगूड पोलिसांनी पंचनामा केला.

ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याने उंदरवाडी गावामध्ये शोककळा पसरली आहे.

Back to top button