Nashik | मतदान केंद्रावरील राष्ट्रवादी नेत्याचा प्रताप! मग काय, पोलिस कर्मचाऱ्याने थेट श्रीमुखातच भडकावली | पुढारी

Nashik | मतदान केंद्रावरील राष्ट्रवादी नेत्याचा प्रताप! मग काय, पोलिस कर्मचाऱ्याने थेट श्रीमुखातच भडकावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शहराच्या मुख्य भागातील पेठे विद्यालयाच्या केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अर्जुन टिळे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिस कर्मचाऱ्याने थेट टिळे यांच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे काहीकाळ केंद्रावर वातावरण तंग झाले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी दुपारी चारच्या सुमारास पेठे हायस्कूल मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी गोडसेंसोबत महायुतीमधील मित्रपक्षांचे नेते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. परिणामी, केंद्राच्या आतील भागात एकच घोळका निर्माण झाला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी नेते व पदाधिकाऱ्यांना गर्दी कमी करून केंद्राबाहेर जाण्याची सूचना केली. मात्र, पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी एक-एक पदाधिकाऱ्यांना धरून केंद्राबाहेर नेण्यास सुरुवात केली. त्यावर टिळे हे पोलिस कर्मचाऱ्यावर धावून गेले. त्यामुळे संतापलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने टिळे यांना बखोट्याला धरून केंद्राबाहेरचा रस्ता दाखविला. मात्र, टिळे यांनी कर्मचाऱ्याचे हात झटकताना अरेरावीची भाषा केली. त्यावर संतापलेल्या कर्मचाऱ्याने थेट टिळेंच्या कानशिलात लगावली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित युतीचे पदाधिकारी काहीकाळ सुन्न झाले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत वाद मिटवला.

तुला उमेदवार ओळखताे का?

पेठे विद्यालयातील बाचाबाचीनंतर अर्जुन टिळे यांना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी बाजूला नेले. मात्र, टिळे यांची शिवीगाळ सुरूच होती. अखेर श्रीमुखात भडकावलेला पोलिस कर्मचारीच पुढे येऊन ‘तुला उमेदवार तरी ओळखतो का’ असा प्रश्न केला. त्यावर उपस्थित मतदारांमध्ये एकच खसखस पिकली.

हेही वाचा:

Back to top button