अँटी स्‍पिटिंग मुव्हमेंट कडून थुंकी बहाद्दरांना अद्दल, कोल्हापुरात प्रबोधन | पुढारी

अँटी स्‍पिटिंग मुव्हमेंट कडून थुंकी बहाद्दरांना अद्दल, कोल्हापुरात प्रबोधन

कोल्‍हापूर; पुढारी वृत्‍तसेवा : अँटी स्‍पिटिंग मुव्हमेंट कार्यकर्ते कोल्‍हापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांसाठी प्रबोधनाचे काम करतात. थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीमार्फत “माझी थुंकी, माझी जबाबदारी..आता बनवायचे कोल्हापूर आरोग्यदायी” ही संकल्पना अनोख्या ढंगात राबवण्यात आली. यामध्ये अँटी स्पिटिंग मुव्हमेंट कार्यकर्त्यांनी चौकाचौकात उभे राहून अनेक थुंकीचंदाना आपली थुंकी पुसायला लावली.

तसेच यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही, समाजाचे आरोग्य बिघडवणार नाही अशी शपथ घ्यायला लावली. तेव्हा आता थुंकी बहाद्दरांमध्ये दहशत निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गेले दीड वर्षापासून ही लोक चळवळ अनेक कृतीतून सक्रिय झाली आहे. यामध्ये कार्यकर्ते सोशल मीडिया, ठिकठिकाणी रस्त्यावर चौकात लोकांना प्रबोधन करणे, शहरात थुंकणे विरोधी होर्डिंग्ज लावणे या माध्यमातून काम करीत आहेत. पण अजूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्‍याबाबतची नाराजी चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

या मोहिमेत विजय धर्माधिकारी, राहुल राजशेखर, दीपा शिपूरकर, सारिका बकरे, सागर बकरे, अभिजित रोटे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्मार्ट सिटीचे महेश ढवळे, उदय दीक्षित, तुषार शिरगुप्पे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच चळवळीतील इतर कार्यकर्ते या उपक्रमात सामील झाले होते.

Back to top button