वॉशिंग्टन ः शून्य किंवा कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या ठिकाणी राहत असताना दैनंदिन जीवनातील अनेक कामे वेगळ्या पद्धतीने करावी लागत असतात. पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक अंतराळवीर राहून वैज्ञानिक प्रयोग करीत असतात. तेथील अंतराळवीर मायक्रोग्रॅव्हिटीमधील अशा जीवनाबाबतचे व्हिडीओही वेळोवेळी शेअर करतात. आता तेथील मेगन मॅकआर्थर या अंतराळवीरांगनेने केसांना शाम्पू कसा लावायचा हे एका व्हिडीओमधून दाखवले आहे.
केसांना शाम्पू लावणे ही पृथ्वीवर एक अतिशय सामान्य बाब आहे. मात्र, अंतराळात हेच काम करीत असताना विशेष काळजी घ्यावी लागते. मेगनने त्याची टप्प्याटप्प्याने माहिती दिली. तिने थोडेसे पाणी केसांवर 'ठेवून' व केस टॉवेलने आच्छादून घेतले जेणेकरून पाण्याचे थेंब इकडे-तिकडे तरंगत जाऊ नयेत! तिने हे पाणी डोक्याला चोळले आणि त्यानंतर कंगव्याने केस विंचरत हे पाणी केसांमध्ये सर्वत्र जाऊ दिले. त्यानंतर तिने विशिष्ट शाम्पू अशाच पद्धतीने केसांना लावून पुन्हा केस विंचरले. शाम्पू लावल्यावर पुन्हा केसांना अशाच पद्धतीने पाणी लावले व टॉवेलच्या कोरड्या भागाने केस पुसून नंतर कंगव्याने केस उभेही करून दाखवले! मेगनचा नुकताच 50 वा वाढदिवस झाला आणि 'ड्रॅगन' कॅप्सूलमधून जे साहित्य स्थानकावर आले त्यामधून आलेल्या आईस्क्रीमची पार्टीही केली!