कोल्हापूर : कोटीची लाच मागणारा पोलिस तिवडे पुन्हा अटकेत | पुढारी

कोल्हापूर : कोटीची लाच मागणारा पोलिस तिवडे पुन्हा अटकेत

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जमिनीच्या दाव्यामध्ये तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावून देण्यासाठी 1 कोटी रुपयांची लाच मागणार्‍या पोलिस नाईक जॉन वसंत तिवडे (रा. रमणमळा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तिवडे सध्या पोलिस खात्यातून बडतर्फ असून, त्याला कळंबा कारागृहातून ताब्यात घेण्यात आल्याचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

जॉन तिवडे हा तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांचा अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. यातून त्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमी वावर सुरू होता. पुणे येथील एमआयटीमध्ये 72 वर्षीय तक्रारदाराच्या जमिनीचा दावा सुरू असल्याची माहिती तिवडेला समजली. त्याने संबंधितांना फोन करून या जमीन दाव्याचा ओळखीतून निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, असे सांगितले. तसेच कोल्हापुरात बोलावून त्यांची भेट घेतली.

या तक्रारदाराकडून एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्‍न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 ऑगस्ट रोजी तिवडेविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, तिवडे याच्याविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यातही आणखीन एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत कळंबा कारागृहात होता. तिथून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Back to top button