कोल्हापूर गणेश फेस्टीवल : गणेशोत्सवात मिरवणूक, ‘डॉल्बी’ला यंदाही बंदी | पुढारी

कोल्हापूर गणेश फेस्टीवल : गणेशोत्सवात मिरवणूक, ‘डॉल्बी’ला यंदाही बंदी

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर गणेश फेस्टीवल : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही गणराय आगमनासह विसर्जन मिरवणुका आणि डॉल्बीच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

कोल्हापूर गणेश फेस्टीवल काळात कायदा – सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर व जिल्ह्यातील 55 गुंडांच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जमा होणार्‍या वर्गणीतील काही रकमेचा वापर लसीकरण व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शहर, जिल्ह्यातील गणेश मंडळांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. गणेश मंडळांनी परवानगीसाठी ऑनलाईनची नोंदणी करावी. कोरोना आणि महापुरामुळे सर्वच क्षेत्रांत मंदीचे सावट असल्याने वर्गणीसाठी सक्ती करू नये, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर गणेशोत्सव पार्श्वभूमीवर शहर, जिल्ह्यातील मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या संयुक्त बैठका झाल्या आहेत. यंदाचा कोल्हापूरचा गणेशोत्सव विधायक उपक्रम राबवून साजरा करण्याचा निर्धारही जिल्ह्यातील सर्वच मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे, असेही बलकवडे यांनी सांगितले.

गणेशोत्सव काळात धनगरी ढोल, लेझीम या पारंपरिक खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्याचा विचार आहे. प्रायोजिक उपलब्ध झाल्यानंतर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Back to top button