कोल्हापूर : किणी-कागल महामार्गावर महापुराचे ब्लॅक स्पॉट कायम | पुढारी

कोल्हापूर : किणी-कागल महामार्गावर महापुराचे ब्लॅक स्पॉट कायम

कोल्हापूर ; सुनील सकटे : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गातील कागल ते किणी या अंतरात पाच ठिकाणी महापुराचे ब्लॅक स्पॉट अद्यापही कायम आहेत. सहापदरीचे काम निविदा प्रक्रियेत रखडल्याने यंदाच्या पावसाळ्यातही महापुराचे पाणी महामार्गावर येण्याचा धोका कायम आहे.

पुणे-बंगळूर महामार्गातील कागल-सातारा या अंतरातील महामार्गाचे सहापदरीचे काम मंजूर आहे. यापूर्वी 22 वेळा निविदा प्रसिद्ध करूनही प्रतिसाद न मिळाल्याने प्रकल्प रद्द केला होता. मात्र, 2019 मध्ये आलेल्या महापुरात महामार्गावर पाणी आल्याने एक आठवडा महामार्ग बंद होता. किणी ते कोगनोळी टोल नाका या अंतरात तब्बल पाच ठिकाणी महापुराचे पाणी येते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद झाली.

दूधगंगा नदी ते मयुर पेट्रोल पंप या परिसरात मयुर पेट्रोल पंप येथे दूधगंगा नदीचे पाणी येते. लिंगनूर येथील नवीन बॉर्डर चेकपोस्ट प्रवेशाची बाजू ते याच ठिकाणी चेकपोस्टची बाहेर पडण्याची बाजू या ठिकाणी दूधगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची फूग येऊन महामार्गावर पाणी साचते. उचगाव नाला पूल ते तावडे हॉटेल या परिसरात पंचगंगा नदीच्या पुराची फूग येऊन पाणी साचले होते. किणी बाह्यमार्ग ते किणी टोल नाका या ठिकाणी पुराचे पाणी येते. वारणा नदी व घुणकी नाल्याच्या महापुराची फूग आल्याने या ठिकाणी महामार्गावर पाणी येत असल्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद होते.

पंचगंगा पूल ते सांगली फाटा या ठिकाणी पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात येते. 2019 मध्ये सांगली फाटा ते पंचगंगा पूल या अंतरात पंचगंगा नदीच्या महापुराचे पाणी सुमारे आठ दिवस साचले होते. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या ठिकाणी महामार्गावरील सर्वात जास्त पाणी साचल्याने शहरात येणारी वाहतूक बंद झाली होती.

महामार्ग महापूरमुक्त होण्यासाठी 13 ठिकाणी भुयारी मार्ग काढण्यात येणार आहेत. मात्र, सहापदरीचे काम अद्याप निविदा प्रक्रियेतच असल्याने प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. आता पावसाळा सुरू झाल्याने सहापदरीचे काम पावसाळ्यानंतरच सुरू होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे यंदाही महापुराचे ब्लॅक स्पॉट कायम राहून महामार्गावर पुराचे पाणी येण्याची शक्यता आहे. पुराचे पाणी महामार्गावर आल्यास महामार्ग बंद राहण्याचा धोका आहे. यापूर्वी तब्बल आठ दिवस महामार्ग बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली होती.

येथे होणार उड्डाणपूल

नागाव फाटा, लक्ष्मी टेकडी, अंबप फाटा, कणेगाव, येलूर फाटा, वाघवाडी, नेर्ले, शेणे-येवलेवाडी, कराड-मलकापूर, मसूर फाटा, नागठाणे आदी ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. तर सांगली फाटा येथे महामार्गाची उंची वाढविण्यात येणार आहे. मात्र, हे काम अद्याप सुरू न झाल्याने यंदाच्या पावसाळ्यातही महामार्ग बंद राहण्याचा धोका आहे.

Back to top button