सिंधुदुर्ग : जिल्हातील ४ रेल्वे स्थानके सुशोभिकरण होणार! : मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते ऑनलाईन भुमिपूजन | पुढारी

सिंधुदुर्ग : जिल्हातील ४ रेल्वे स्थानके सुशोभिकरण होणार! : मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते ऑनलाईन भुमिपूजन

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी आणि सिंधुदुर्गनगरी या ४ रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी २३ कोटी रूपये निधी मंजुर झाले. त्या कामांची निविदा प्रक्रिया पार पडली. या कामांचे ऑनलाईन भुमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथुन मंगळवारी (दि.८) संपन्न झाले.

कोकणच्या पर्यटनला चालना देण्यासाठी आमचे प्रयत्न चालु आहेत. कोकणला सिंधुदुर्गने भरभरून दिले आहे. केवळ आता नियोजनाची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. कुडाळ रेल्वे स्थानक येथे माजी खा. निलेश राणे यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले.

कोकणातील एकुण १२ रेल्वे स्थानकावरील रस्त्यांचे कॉक्रिटीकरण, फुटपाथ, आरसीसी गटर, संरक्षण भिंत, प्रवेशद्वार कमान, बस थांबा, रिक्षा थांबा, बागकाम व इतर सुशोभिकरण, रेल्वे स्थानकांना जोडणारा रस्ता कॉक्रिटीकरण व परिसर सुशोभित करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ- ६ कोटी, कणकवली-६ कोटी, सावंतवाडी-६ कोटी व सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्टेशनसाठी ५ कोटी रूपये असे एकुण २३ कोटी रूपये निधीची तरतुद करून निविदा प्रक्रिया पार पडली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील ५ व रायगड जिल्ह्यातील ३ रेल्वे स्थानके अशा कोकणातील एकूण १२ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

या कामांचा शुभारंभ एकाच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आला. यावेळी मुंबई येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मंत्री नारायण राणे,शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. तर कुडाळ येथे माजी खा. निलेश राणे,महिला आघाडी प्रमुख सौ. संध्या तेरसे, माजी जि.पं. अध्यक्ष दिपलक्ष्मी पडते, अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये,बाबा परब,,खरेदी विक्री संघ चेअरमन दिपक नारकर, राजु राऊळ, आनंद शिरवलकर, अभी गावडे, बंड्या सावंत आदि सह साहाय्यक अभियंता अजित पाटील, कुडाळ उपअभियंता सौ.सीमा गोवेकर उपस्थित होते.

यावेळी ना. फडणवीस म्हणाले की, नजिकच्या काळात कोकणचा नजरेत भरेल असा विकास आपल्या सर्वांना दिसेल. कोकणातील सिंचन प्रकल्पांना सुध्दा अधिक गतीने चालना दिली जाईल असे सांगितले. ना.रविंद्र चव्हाण म्हणाले की, कोकणातील रेल्वे स्टेशनही एअरपोर्ट प्रमाणे व्हायला हवीत, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात कोकणातील 12 रेल्वे स्थानके सुशोभिकरणासाठी घेण्यात आली आहेत. कोकणसाठी हा महत्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. निलेश राणे म्हणाले की, तत्कालिन पालकमंत्री नारायण राणे असताना सिंधुदुर्गला जसा निधी मिळत होता, तसा निधी आता पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मिळत आहे. सिंधुदुर्गातील चार रेल्वे स्थानके एकाच वेळी सुशोभिकरण होत आहेत. त्यासाठी लागणार्‍या 23 कोटी रूपये निधीची आखणी गेल्या कित्येक महिन्यापासुन ना.चव्हाण यांनी केली होती. त्याचा साक्षीदार मी स्वतः असल्याचे सांगत ना.चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले.

हेही वाचा;

Back to top button