रत्नागिरी : शिक्षकांच्या रिक्त पदासाठी शिवसेनेचा जिल्हा परिषदेवर हल्लाबोल  | पुढारी

रत्नागिरी : शिक्षकांच्या रिक्त पदासाठी शिवसेनेचा जिल्हा परिषदेवर हल्लाबोल 

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : आंतरजिल्हा शिक्षक बदलीमुळे आणि सेवानिवृत्त होत असलेल्या शिक्षकांमुळे रिक्त पदांची संख्या २ हजाराच्या घरात पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी शून्य शिक्षकी शाळा सुरू झाल्या आहेत. याबाबत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक पवित्रा घेत आज (दि.१९) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. जवळपास २०० पेक्षा जास्त कार्यकर्ते आक्रमक झाल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली होती. येत्या आठ दिवसात शाळांमध्ये शिक्षकांचा समतोल राखला नाही, तर जिल्ह्यात एकही शाळा उघडू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यात १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली आहे. परंतु सध्या शिक्षकांच्या रिक्त पदांचा विषय ऐरणीवर आला आहे. आंतरजिल्हा बदलीने दीड महिन्यापूर्वी ७१५ शिक्षकांना परजिल्ह्यात जावे लागले आहे. त्यात पूर्वीची १ हजार १०० पदं रिक्त असून सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षकांची संख्या महिनाअखेर वाढत जात आहे. सध्या २ हजार पदं रिक्त आहेत. मंजूर पदं आणि सध्या असलेली पदं बघता ३० टक्के पदं रिक्त आहेत. यामुळे शिक्षकांची कमतरता भासत असून ग्रामीण भागातील शाळांची अवस्था बिकट झाली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी सोमवारी अचानक जिल्हा परिषदेवर धडक मारून आंदोलन करत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार व शिक्षणाधिकारी यांना कोंडित पकडलं होतं. जवळपास दीडतास या विषयावर चर्चा सुरू होती. शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासनाला उत्तरं देताना नाकीनऊ आले.

मूळात शिक्षकांची पदे रिक्त असताना आंतरजिल्हा बदल्या का करण्यात आल्या? शासनाचा नियम १० टक्के पेक्षा जास्त पदं रिक्त असतील तर आंतरजिल्हा बदली करू नयेत. मूळात ३० टक्के पदे रिक्त आहेत. असे असताना या बदल्या का करण्यात आल्या? असा सवाल शिवसैनिकांनी यावेळी उपस्थित केला.तसेच शून्य शिक्षकी शाळा झाल्याने तेथील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अजूनही त्या शाळांमध्ये शिक्षक गेलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हातच उभे रहावे लागत आहे. हाही मुद्दा यावेळी शिवसैनिकांनी उपस्थित केला. शिक्षक भरती जर लवकर होत नसेल तर तात्पुरत्या स्वरुपात जिल्ह्यातील डीएड, बीएड धारकांना मानधनावर घ्यावे, तसेच ज्या सहाव्या टप्प्यातील बदल्या झाल्या. त्या स्थगित कराव्यात, अशी मागणीही शिवसैनिकांच्या वतीने यावेळी करण्यात आली.

येत्या आठ दिवसात शाळांमधील शिक्षकांचा समतोल राखला नाही तर तीव्र आंदोलन करून जिल्ह्यातील एकही शाळा उघडली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख व माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी जि.प. अध्यक्ष आबा घोसाळे, माजी जि.प. सदस्य उदय बने, माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम, प्रमोद शेरे, राकेश साळवी, महिला प्रतिनिधी साक्षी रावणंग, महेंद्र झापडेकर आदी उपस्थित होते.

     हेही वाचलंत का ? 

 

Back to top button