रत्नागिरी : शिक्षक नसल्याने भरली नाही माळवाशीत शाळा | पुढारी

रत्नागिरी : शिक्षक नसल्याने भरली नाही माळवाशीत शाळा

देवरूख; पुढारी वृत्तसेवा : शाळेसाठी शिक्षक द्या; अन्यथा आम्ही शाळेत मुलांना पाठवणार नाही, असा पवित्रा माळवाशीतील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी पंधरा दिवसांपूूर्वीच घेतला होता. शाळा सुरू होण्याच्या दिवशीही शाळेत शिक्षक न मिळाल्याने अखेर ग्रामस्थांनी मुलांना जि. प. शाळेत पाठवले नाही, त्यामुळे शाळाच भरली नाही. गुरुवारी शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांशी ग्रामस्थांनी चर्चा केल्यानंतर दोन-तीन दिवसांत शिक्षक देण्याबाबत आश्वासन दिले. त्यामुळे माळवाशीतील केंद्रशाळा शुक्रवारपासून भरवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

देवरूखनजीकच्या माळवाशी गावात जिल्हा परिषदेची केंद्रशाळा असून, 1 ते 7 वीपर्यंत 59 पटसंख्या आहे. येथे सध्या 3 शिक्षक कार्यरत आहेत. मुख्याध्यापकपदही रिक्त आहे. केंद्रशाळा असल्याने सभा व इतर शैक्षणिक कामांसाठी यातील एक, दोन शिक्षक कायम गुंततात. पटसंख्या असूनही शिकवायला शिक्षक नाहीत, अशी स्थिती असल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही, असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी शाळाच भरवली नाही.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर करंडे, उपाध्यक्ष विकास सावंत व ग्रामस्थ यांनी पंचायत समितीला पंधरा दिवसांपूर्वी शिक्षक मिळण्याची मागणी केली होती. मात्र शिक्षण विभागाने शिक्षक न दिल्याने गुरुवारी एकाही विद्यार्थ्याला शाळेत पाठवण्यात आले नाही. दिवसभराचे सगळे शैक्षणिक कार्यक्रम रद्द झाले.

शाळेसाठी शिक्षक मिळावा, ही ग्रामस्थांची मागणी गावचे उपसरपंच सुनील सावंत यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांकडे मांडली. चर्चेनंतर 2 ते 3 दिवसांत या शाळेवर शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी शुक्रवारपासून शाळा भरवण्याचा निर्णय घेतला आहे.

Back to top button