Narendra Dabholkar Case Verdict | डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघांची निर्दोष मुक्तता | पुढारी

Narendra Dabholkar Case Verdict | डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघांची निर्दोष मुक्तता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण खटल्याचा तब्बल ११ वर्षांनी शुक्रवारी (दि.१०) निकाल लागला. दाभोलकर हत्या प्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाने वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केली. तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुण्यातील विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

अंदुरे आणि कळसकर यांची गोळीबार केल्याची कबुली

अंदुरे आणि कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे. तर, डॉ. तावडे याचा या गुन्ह्यात हेतू दिसून आलेला आहे. तसेच त्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले. तर भावे आणि पुनावळेकर यांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे त्यांचा या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे जाधव यांनी निकालात नमूद केले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना २० ऑगस्ट २०१३ या दिवशी त्यांची महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने अवघे राज्य हादरले. दाभोलकरांच्या हत्येनंतर तब्बल आठ वर्षांनी हा खटला सुरू होण्यास मुहूर्त लागला.

या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन सप्टेंबर २०२१ मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने पाच आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला सुरू आहे. या खटल्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली आणि शुक्रवारी (दि. १० मे) या खटल्याचा निकाल लागला.

२०१४ मध्‍ये सीबीआयने डॉ. दाभोलकर हत्‍या प्रकरणाचा तपास सुरु केला. २०१९ मध्‍ये पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्‍यात आले होते. त्यानंतर पाचही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले. सप्टेंबर २०२१ मध्ये खटला सुरू झाला होता.

हेही वाचा

Back to top button