रत्नागिरी: खेडमध्ये पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा काळ्या फिती लावून निषेध | पुढारी

रत्नागिरी: खेडमध्ये पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा काळ्या फिती लावून निषेध

खेड : पुढारी वृत्तसेवा- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि राज्यातील पत्रकारांवर दिवसेंदिवस होत असलेले हल्ले या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी खेड मधील विविध वृत्तपत्र, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी दि.१० रोजी येथील तहसिल कार्यालयाच्या आवारात मूक निदर्शने करत निषेध नोंदवून पोलीस व प्रशासनाला निवेदन दिले.

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे निर्घृण हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत चालवावा. तसेच वारीशे यांची हत्या करणारऱ्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यास मोक्का लावावा, हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावेत, वारीशे यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये सरकारने मदत द्यावी, अशा मागण्या यावेळी निवेदनातून शासनाकडे करण्यात आल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनात ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत चाळके, दिवाकर प्रभू, सदानंद जंगम, हर्षदीप सासने, दिलीप देवळेकर, शशांक सिनकर,उत्तम जैन , किशोर साळवी, जितेश कोळी, चंद्रकांत बनकर, सिद्देश परशेटे, अनुज जोशी, देवेंद्र जाधव, ज्ञानेश्वर रोकडे, इकबाल जमादार, संतोष आंबरे, सुनील आंब्रे, रुपेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Back to top button