गेहलोतांनी वाचला मागील अर्थसंकल्‍प, चूक लक्षात आल्‍यानंतर मागितली सभागृहाची माफी | पुढारी

गेहलोतांनी वाचला मागील अर्थसंकल्‍प, चूक लक्षात आल्‍यानंतर मागितली सभागृहाची माफी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थान विधानसभेत आज २०२३-२४ अर्थसंकल्‍प ( Rajasthan Budget )  सादर करण्‍यात आला. यावेळी मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत हे मागील वर्षीचा अर्थसंकल्‍पीय वाचत राहिले. काही मिनिटांनंतर  राजस्‍थानचे पाणीपुरवठा मंत्री महेश जोशी यांनी ही चूक मुख्‍यमंत्री गेहलोत यांच्‍या निदर्शनास आणून दिली. यानंतर गेहलोत यांनी भाषण थांबवले. या चुकीमुळे विरोधकांनी गदारोळ घातला. प्रचंड गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. अखेर सभागृहाची माफी मागून गेहलोत यांनी यंदाचा म्‍हणजे २०२३-२४ अर्थसंकल्‍प सादर केला.

Rajasthan Budget : सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब

राजस्‍थान विधानसभेत आज अर्थसंकल्‍प सादर करण्‍यात आला. यावेळी अशोक गेहलोत यांनी मागील वर्षीचा अर्थसंकल्‍प वाचण्‍यास सुरुवात केली. काही वेळानंतर ही चूक त्‍यांच्‍या निदर्शनास आणून दिली गेली. विरोधी पक्षाच्‍या सदस्‍यांनी या चुकीचा तीव्र  निषेध केला. विरोधी पक्ष सदस्‍यांनी सभागृहाच्‍या मोकळ्या जागेत आले. यावेळी प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. मुख्यमंत्री जुने भाषण वाचत असून अर्थसंकल्प लीक झाला आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते व उपनेते यांनी केला.  भाजप आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केल्‍याने गोंधळ वाढू लागला. र सभापतींनी 11.12 वाजता सभागृहाचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब केले.

अखेर तिसर्‍यांदा अर्थसंकल्‍पीय भाषणासाठी उभा राहिल्‍यानंतर गेहलोत यांनी झालेल्‍या प्रकाराबद्दल माफी मागितली. झालेल्‍या चुकीबाबत खुलासा करताना अशोक गेहलोत म्‍हणाले की, मला मिळालेल्‍या अर्थसंकल्‍पाच्‍या प्रतीमध्‍ये एक पान जास्‍त होते. माझ्‍याकडून नजर चुकीने ते पान वाचले गेले.

जे घडले ते दुर्दैवी : विधानसभा अध्‍यक्ष

गदारोळामुळे राजस्‍थान विधानसभेचे कामकाज तहकूब करण्‍यात आले. कामकाज पुन्‍हा सुरु झाल्‍यानंतर विधानसभा अध्‍यक्ष सीपी जोशी म्‍हणाले की, “आज सभागृहात घडलेला प्रकार दुर्दैवी होता. या घटनेने मला दु:ख झाले. मानवाकडून चुका होत राहतात. आजच्‍या अप्रिय घटनेसाठी मी केलेली सर्व कारवाई रद्द करतो. सकाळी ११ ते ११:४२ पर्यंतची संपूर्ण घटना विधानसभेच्या कामकाजातून वगळण्यात आली आहे.”

चूक बाहेरच्या व्यक्तीने कशी सांगितली? : कटारिया

काही मिनिटे चुकीचे वाचन केल्यानंतर तिसरी व्यक्ती आली. तिनेचुकीचे वाचन होत असल्याचे सांगितले. अर्थसंकल्प लीक झाला आहे, अर्थसंकल्‍प हा गोपनीय असतो आणि त्याची प्रत मुख्यमंत्र्यांशिवाय इतर कोणाकडे कशी पोहोचली? तिसऱ्या व्यक्तीला हा अर्थसंकल्प कसा मिळाला?, असा सवाल करत आजच्या घटनेने लोकशाहीला काळीमा फासला आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी दिली.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button