रत्नागिरी : देवरूख येथील विवाहितेचा मृत्यू नव्हे, आत्महत्या | पुढारी

रत्नागिरी : देवरूख येथील विवाहितेचा मृत्यू नव्हे, आत्महत्या

साडवली : पुढारी वृत्तसेवा : देवरूख शहरातील विवाहितेचा रविवारी झालेला मृत्यू हा आकस्मिक नसून ती आत्महत्या असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अभिजीत पवार याच्याविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात आज (दि.१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित दिलीप पवार (वय ३१, रा. मच्छीमार्केट, देवरूख) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नी दिप्ती अभिजित पवार (वय २८) ही नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी गेली होती. घरी येताना ती रस्त्याच्या बाजूला चक्कर येऊन बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला देवरूख ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या घटनेची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली होती.

मात्र, पोलिसांना तपासादरम्यान तिच्या राहत्या घरातून एक चिठ्ठी सापडली. यात आपला पती कायम संशय घेतो, मारहाण करतो, असे नमूद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी दिली. दरम्यान, सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास साळोखे यांनी भेट देत या प्रकरणी कसून चौकशीचे आदेश दिले. यानंतर तिच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली. चौकशीअंती पती अभिजीत पवार याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड काँन्स्टेबल संतोष सडकर करत आहेत.

हेही वाचलंत का ?

Back to top button