हिंगोली : नागनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त शासकीय महापूजा | पुढारी

हिंगोली : नागनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त शासकीय महापूजा

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा: देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे नागनाथाच्या दर्शनासाठी पहिल्याच श्रावणी सोमवारी लाखो भाविकांची गर्दी झाली होती. हर हर महादेवच्या गजरात येणाऱ्या भाविकांमुळे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. महाराष्ट्रासह बाहेर राज्यातील भाविक दर्शनासाठी आले होते.

औंढा नागनाथ येथे नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी रविवारी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास नागनाथ संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार कृष्णा कानगुले यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली. यावेळी मुख्य पुजारी तुळजादास भोपी, पद्माक्ष पाठक, तुळजादास भोपी, बंडू पंडित, जिवन रुषी, आबागुरु बल्लाळ, वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेद्र डफळ, उदगीरे, बापुराव देशमुख, नागेश माने, कृष्णा पाटील आदींची उपस्थिती होती.

त्यानतंर पहाटे दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. पहाटे पासून लागलेल्या रांगा दुपार पर्यंत कायम होत्या. महाराष्ट्रासह दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात या भागातील भाविक आज दर्शनासाठी आले होते. यावेळी भाविकांना संस्थानच्या वतीने प्रसाद म्हणून उसळ वाटप करण्यात आली. नागनाथाच्या दर्शनासाठी दुपारपर्यंत भाविकांची गर्दी कायम होती. हर हर महादेवचा गजर करीत परिसरातील भाविक दर्शनासाठी येत होते. दर्शनासाठी दोन ते तीन तास रांगेत उभे रहावे लागत होते.

दरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच ठेवण्यात आला असून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल लांडगे, पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button