

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलगू देसम पार्टीचे संस्थापक नंदामुरी तारका रामाराव (एनटीआर) यांची धाकटी मुलगी कंथामेनी उमा माहेश्वरी हिने हैदराबाद येथील जुबली हिल्स येथील तिच्या घरी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या वहिनीही होत्या. (NTR Daughter Suicide)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांना त्याचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दरवाजा आतून बंद होता. प्राथमिक तपासानुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे कंथामेनी उमा माहेश्वरी या डिप्रेशनमध्ये होत्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उस्मानिया हॉस्पिटलमध्ये पाठवला. पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उमा माहेश्वरी या एनटी रामाराव यांच्या चौथ्या कन्या होत्या. (NTR Daughter Suicide)
एनटी रामाराव यांच्या 12 अपत्यांपैकी उमा माहेश्वरी या सर्वात लहान होत्या. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दग्गुबती पुरंदेश्वरी आणि टीडीपी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी या त्यांच्या बहिणी आहेत. एनटी रामाराव यांनी त्यांच्या कारकिर्दीत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केले. यानंतर त्यांनी राजकारणातही हात आजमावला. त्यांनी टीडीपी (तेलुगु देसम पार्टी) स्थापन केली. ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. (NTR Daughter Suicide)