सिंधुदुर्ग : स्वतःच्या स्वार्थासाठी खा.विनायक राऊतांकडून गटबाजीचे राजकारण | पुढारी

सिंधुदुर्ग : स्वतःच्या स्वार्थासाठी खा.विनायक राऊतांकडून गटबाजीचे राजकारण

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यात खा. विनायक राऊत हेही मागे नाहीत. केवळ मातोश्रीला खूष करण्यासाठी त्यांचा आटापिटा असतो. ते मुंबईत आमदार असल्यापासून ते आतापर्यंत सातत्याने पक्षात गटबाजीचेच राजकारण केले आहे. गटातटाचे राजकारण करुन स्वतःचा स्वार्थ साधण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही. त्यांची गटबाजी शिवसेनेला भोवली, अशी टीका मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केली.
कणकवलीतील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपरकर म्हणाले, शिंदे गटातील एका खासदाराने विनायक राऊत यांच्या कार्यपद्धतीचा पोलखोल केला आहे. शिवसेना सचिव म्हणून आपल्यालाच सर्व अधिकार आहेत अशा अविर्भावात त्यांनी पक्षात वेळोवेळी राजकारण केले, गटबाजी केली. ज्यावेळी नारायण राणे हे शिवसेनेत बंड करुन बाहेर पडले त्यावेळी आम्ही काही मोजकेच शिवसैनिक त्यांच्याशी लढा देत होतो. मात्र, विनायक राऊत हे त्यावेळी जिल्हयात येताना गाडीवरचा भगवा झेंडा खारेपाटण सिमेवर गाडीत ठेवून येत होते. मात्र जिल्हयात येवून केवळ फुशारक्या मारायचे. जिल्हयात खा. विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या गटामुळे शिवसेनेचेच नुकसान झाले. आम्ही शिवसेनेसोबत म्हणणारे कितीजण शिवसेनेत राहतील हे लवकरच खा. राऊतांना समजेल. जे निष्ठावंत राहतील त्यांनाही गटातटाचे राजकारण करुन खा. राऊत पक्षाबाहेर घालवतील असा टोला उपरकर यांनी लगावला.

ते म्हणाले, नारायण राणेंच्या शिवसेना बंडानंतर झालेल्या हल्ल्यावेळीही खा. राऊत स्वतःच्या घरात बसून होते. जखमी कोरगावकरांना हॉस्पिटलमध्ये दाखल करायला आम्ही पुढे होतो. हल्ला करणारे संजय पडते आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर विनायक राऊत यांना कसलीच झळ बसली नाही, अशी टीका उपरकर यांनी केली.

Back to top button