आंबा घाटात खोल दरीत कार कोसळली; २ महिन्याच्या बाळासह एका महिलेचा जागीच मृत्यू | पुढारी

आंबा घाटात खोल दरीत कार कोसळली; २ महिन्याच्या बाळासह एका महिलेचा जागीच मृत्यू

साडवली : पुढारी वृत्तसेवा :

सांगली येथून गणपतीपुळे येथे जाणारी कार रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील खोल दरीत कोसळली. हा अपघात गुरूवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन महिन्याच्या बाळासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सांगली येथील एक कुटुंबिय गणपतीपुळे येथे (KA 32 /Z- 0949) किया सँल्टोस कारने देवदर्शनासाठी जात होते. मात्र कार आंबा घाटातील गायमुखजवळील विसावा पाँईंट येथे आली असता चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्याचप्रमाणे साखरपा व आंबा येथील स्थानिक तरूणांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. तसेच देवरूख पोलीस ठाण्याचे कर्मचारी व राजू काकडे हेल्प अँकँडमीची टिम रेस्क्यू आँपरेशनसाठी घटनास्थळी दाखल झाली. या सर्वांनी वेळ न लावताच रेस्क्यू आँपरेशन राबवण्यास सुरूवात केली. मात्र खोल दरी व आजुबाजुला जंगल असल्यामुळे मदतकार्यात अडथळा येत होता.

अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलीसांनी तात्‍काळ मदत केली. तर तहसीलदार यांनी घटनास्थळी जावून परिस्थितीची पाहणी केली. अपघातग्रस्त कुटुंबीय सांगली विश्राम बाग येथील होते. देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे जात असतानाच वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघात घडला त्याठिकाणी कठडा नसल्यामुळेच हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या हलगर्जीपणामुळेच अपघात घडला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

तसेच, या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी स्विफ्ट गाडीचा अपघात होवून ही गाडी खोल दरीत कोसळली होती. या अपघातात एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला होता. मात्र त्यावेळी पोलीस विभाग यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. जर याठिकाणी कठडा असता तर हा अपघात घडला नसता. असे नागरिकांनी सांगितले. अपघातातील गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी कोल्हापूरात हलवण्यात आले आहे. पुढील तपास साखरपा पोलीस करीत आहेत.

दरम्‍यान, शिवांश हरकुडे (वय २ महिने), सृष्टी संतोष हरकुडे (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात संतोष हरकुडे, दीप्ती फुलारे, प्रताप तपस्ते, रेयान सुभेदार, आद्या फुलारे, तन्मिना हरकुडे हे सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. १०८ ॲम्बुलन्स, नरेंद्र महाराज संस्थान ॲम्बुलन्स यांनी घटनास्थळी बचावकार्यात मदत केली. यावेळी जय शिवराय मित्रमंडळ साखरपा, राजू काकडे हेल्प अँकॅडमी, देवरूख, आंबा घाटातील स्थानिक नागरिक यांनी बचावकार्यात केलेल्या धाडसाचे कौतुक करण्यात आले. यावेळी वैभव भोसले, बाबू चव्हाण, अक्षय महाडिक, संजय जांगळी, रवी फोंडे, मंगेश फोंडे ,प्रमोद माळी, सुनील काळे, अविनाश कांबळे, वैभव डौर, शुभम पाटील, राजू काकडे हेल्प अँकॅडमी देवरुखचे राजा गायकवाड, सिद्देश वेल्हाळ, दिलीप गुरव, चंद्रकांत भोसले आदींनी रेस्क्यू आँपरेशनमध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा   

गडचिरोली : पत्‍नीने आत्‍महत्‍या केल्‍याचे समजताच सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्‍महत्‍या 

मालेगाव : डिपार्टमेंट को बताते है ‘हम कौन है’ म्हणत त्याने पोलिसांवर झाडली गोळी 

जळगाव : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

Back to top button