मालेगाव : डिपार्टमेंट को बताते है ‘हम कौन है’ म्हणत त्याने पोलिसांवर झाडली गोळी | पुढारी

मालेगाव : डिपार्टमेंट को बताते है 'हम कौन है' म्हणत त्याने पोलिसांवर झाडली गोळी

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ; रस्ता लुटमारीच्या घटनेतील संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांवरच संकट ओढवल्याचा प्रकार बुधवारी (दि.9) रात्री घडला. दोघा संशयितांच्या मुसक्या आवळताच झटापट होऊन एकाने ‘ये जान से जाऐंगे तो डिपार्टमेंट को समज आएगा अपुन कोन है’ म्हणत थेट गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या अनपेक्षित प्रतिकाराने पकड ढिली होऊन पोलिस एक पाऊल मागे झाले आणि संशयितांना वेगवेगळ्या मार्गांनी पळ काढला. शहरातील सरदारनगरमध्ये ही घटना घडली.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे गिरीश निकुंभ यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्याप्रमाणे, सोमवारी (दि.7) रात्री पाच अज्ञातांनी एजाज अहमद खुर्शीद अहमद (52, रा. इस्मामपुरा) या कारखानदाराचे त्याच्याच दुचाकीवरुन अपहरण केले होते. त्याच्या खिशातील तीन हजार रुपये रोख आणि मोबाईल काढून घेतला. एटीएम आणि त्याचा पीन घेऊन जवळच्या एटीएममधून 25 हजारांची रोकड काढली आणि नंतर कारखानदाराला 60 फुटी रस्त्यावर उतरवून त्याची दुचाकी घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी पकडले होते. त्याच्याकडून प्राप्त माहितीनुसार जमाल बिल्डर आणि सलमान (पूर्ण नाव माहिती नाही) हे साथीदार सरदार चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे हवालदार गिरीश निकुंभ आणि पोलिस नाईक सुभाष चोपडा यांनी रात्री 9 वाजता सापळा रचला.

त्याठिकाणी दोघे संशयित येताच त्यांची बखोटी पकडण्यात आली. दोघांनी शिविगाळ आणि दमदाटी करित विरोध केला. सलमानने ‘ये पुलिसवाले बहुत शाने बनते है, ठोक दो इन्हे’ असे आव्हान देताच जमाल बिल्डरने कमरेला लावलेले गावटी पिस्तुल काढून पोलिसांच्या दिशेने एक राऊंड फायर केला. तो चुकविण्यासाठी पोलिसांनी समयसुचकता दाखवल्याने पोलिस बचावले मात्र हल्लेखोर फरार होण्यात यशस्वी झाले.

या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह मोठा बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिस संशयितांच्या मागावर असून, एकूण पाच आरोपी असल्याची सांगण्यात येत आहे. दरम्यान, दुसर्‍यांदा पोलिसांवर गोळीबाराची घटना घडल्याने गुन्हेगारांना धाक उरला नसल्याची प्रतिक्रिया सर्वसामन्यांतून उमटत आहे.

Back to top button