UP election results 2022 : ‘योगी सरकार’ची वापसी; ‘यूपी’त पुन्हा डबल इंजिनचं सरकार, ३७ वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलं! | पुढारी

UP election results 2022 : 'योगी सरकार'ची वापसी; 'यूपी'त पुन्हा डबल इंजिनचं सरकार, ३७ वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलं!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : UP election results 2022 : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काय होणार, याची धाकधूक जशी भारतीय जनता पक्षाला लागली होती तशी ती अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षालाही लागली होती. अखेरीस राज्यातील जनतेने योगी आदित्यनाथ यांच्या पाच वर्षांच्या कारभारावर विश्वास टाकत पुन्हा भाजपला सत्तेपर्यंत पोहोचविले आहे. निवडणूक प्रचारावेळी भाजपने ‘योगीच उपयोगी’ असा नारा दिला होता. हा नारा भाजपने सार्थ करून दाखविला आहे. निकालानंतर राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार धावणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

उत्तर प्रदेशात भाजपने 403 पैकी अडीचशेच्या वर जागा खेचून आणल्या आहेत. गतवेळच्या तुलनेत भाजपच्या जागांची संख्या कमी झाली आहे, पण ज्या परिस्थितीत भाजपने हे यश खेचून आणले आहे, ते निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल. या विजयाचे श्रेय जसे गृहमंत्री अमित शहा यांना द्यावे लागेल, तसे ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही द्यावे लागेल. योगी आदित्यनाथ यांनी स्वतःची ठेवलेली स्वच्छ प्रतिमा, प्रशासनावरील त्यांची पकड, महिलांची सुरक्षा, कायदा – सुव्यवस्थेची बऱ्यापैकी स्थिती, धार्मिक स्थळांचा विकास, ऊस शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार आदी बाबी भाजपला मदत करणाऱ्या ठरल्या. विशेषतः महिला वर्गाने भाजपला या निवडणुकीत भरभरून मतदान केल्याचे दिसून आले आहे.

३७ वर्षानंतर पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात असे घडले

भाजपला सलग दुसऱ्यांदा बहुमताचे सरकार सत्तेत आणण्याची किमया साधता आली आहे. अशी कामगिरी 37 वर्षानंतर पहिल्यांदाच कोणा पक्षाला करता आली आहे. एखाद्या मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुढील निवडणुकीनंतर तो मुख्यमंत्री होऊ शकलेला नाही, हा आजवरचा उत्तर प्रदेशचा इतिहास आहे. हा इतिहास योगी आदित्यनाथ मोडण्याच्या मार्गावर आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम केला होता. अशा स्थितीत ओबीसी वर्गाची मते एकसंध ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मोठी मेहनत घेतली होती. त्यामुळे यशात त्यांचेही मोठे श्रेय आहे.

समाजवादी पक्षासाठी निकाल अत्यंत निराशाजनक ठरला आहे. जातीय समीकरणे साधण्याबरोबरच प्रचारसभा झंझावाती कशा होतील, याकडे अखिलेश यादव यांनी कटाक्षाने लक्ष दिले होते. प्रचाराची सगळी सूत्रे आपल्या हातात ठेवत त्यांनी सारे राजकीय कौशल्य पणास लावले होते. अखिलेश भाजपच्या हातून सपा सत्ता खेचून आणणार, असा गवगवा दरम्यानच्या काळात झाला होता. मात्र सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यात अखिलेश अपयशी ठरले. गतवेळी सपाने काँग्रेससोबत निवडणूक लढविली होती, त्यावेळी दोन्ही पक्षांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी सपाने काँग्रेससोबत जाणे टाळले, मात्र तरीही लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात हा पक्ष अपयशी ठरला. ठराविक जातीचे लांगुलचालन करणारा, गुंड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणारा पक्ष हे आरोप खोडून काढण्यात अखिलेश यांना अपयश आले.

प्रियांका गांधी यांना अपयश

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा पुन्हा योगी आदित्यनाथ यांच्याकडे येणे ही आता औपचारिकता आहे. ते मुख्यमंत्री बनले तर तब्बल 15 वर्षानंतर एखादा निवडून आलेला नेता मुख्यमंत्री बनेल. याआधी 2007 साली मायावती, 2012 साली अखिलेश यादव आणि 2017 साली योगी आदित्यनाथ हे विधान परिषदेचे सदस्यत्व घेऊन मुख्यमंत्री बनले होते. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मायावती यांच्या बसपा आणि प्रियांका गांधी-वधेरा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. दोन्ही पक्षांना दुहेरी आकडा देखील ओलांडता आला नाही. प्रियांका गांधी – वधेरा यांनी ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी घोषणा करीत महिलांवर भरोसा ठेवला. गेल्या पाच वर्षात प्रियांका यांनी उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. मात्र त्याना आपला करिश्मा दाखविता आला नाही. काँग्रेस अध्यक्षपदासाठीची त्यांची दावेदारी या पराभवामुळे धोक्यात येणार आहे.

UP election results 2022 : अखिलेश यांचा अंदाज चुकला

भाजपने या निवडणुकीत अनुप्रिया पटेल यांच्या अपना दलसोबतच अन्य काही छोट्या पक्षांसोबत युती केली होती तर समाजवादी पक्षाने जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाबरोबर आघाडी केली होती. शेतकरी आंदोलनामुळे पश्चिम उत्तर प्रदेशातील लोकांच्या मनात भाजपबद्दल रोष होता. त्याचा लाभ मिळेल तसेच जाट – मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते मिळतील, हा अखिलेश यांचा अंदाज चुकला.

Koo App

Back to top button