जालना : वाळू माफियाचा पोलीस पथकावर हल्ला; ट्रॅक्टर घातला अंगावर | पुढारी

जालना : वाळू माफियाचा पोलीस पथकावर हल्ला; ट्रॅक्टर घातला अंगावर

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकाच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक्टर घातल्याची घटना घडली. अंबड तालुक्यातील आपेगाव गोदावरी नदी पात्रात दि.२० जुलै रोजी दुपारी २ च्या दरम्यान ही घटना घडली. गोंदी पोलीस पथकावर झालेल्या या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. संबंधीत ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाला आहे.

गोदावरी परिसरात आपेगाव येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली. त्यानंतर गोंदी पोलिसांचे पथक अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी रिक्षा घेऊन आपेगाव येथे गेले. यावेळी गोदावरी पात्रातून अवैध वाळूचे ट्रॅक्टर भरून येत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या पथकाने हे ट्रॅक्टर येताच त्यासमोर उभे राहत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ट्रॅक्टर चालकाने या पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून हल्ला केला.

या घटनेत डीबी पथकाचे प्रमुख कल्याण आटोळे यांच्या पायावरून ट्रॅक्टरचे दोन्ही चाक गेल्याने पाय मोडल्याने ते गंभीर जखमी झाले. याव्यतिरिक्त महेश तोटे, अशोक नागरगोजे यांनी झटापटीदरम्यान उडी मारल्याने त्यांच्या पायाला मार लागला आहे. ट्रॅक्टर अंगावर घालून चालक वाहन घेऊन पसार झाला आहे. सदर घटनेत गंभीर जखमी झालेले डीबी पथक प्रमुख कल्याण आटोळे यांच्यावर शहागड येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना जालना येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी अवैध वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा

Back to top button