कोल्हापूर : पन्हाळा गडावरून ‘पुरातत्व’च्या टेबल, खुर्च्या फेकल्या; संभाजी ब्रिगेडचे आंदोलन | पुढारी

कोल्हापूर : पन्हाळा गडावरून 'पुरातत्व'च्या टेबल, खुर्च्या फेकल्या; संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक पन्हाळा गडावर आज (दि.२०) संभाजी ब्रिगेडच्या वतीने दुतोंडी बुरुज येथे पुरातत्व विभागाच्या कार्यालयातील टेबल खुर्च्यांचे कडेलोट करत आंदोलन करण्यात आले. गड संवर्धनासाठी कोणत्याही प्रकारची पूर्तता होत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आले होते.

आंदोलक पुरातत्व विभागाच्या कार्यालयात गेले असता तेथे कोणी अधिकारी हजर नव्हते. यावेळी खुर्ची व टेबल घेऊन आंदोलक दुतोंडी बुरुज येथे पोहोचले. आंदोलकांनी टेबल व खुर्च्या व फाइल्स गडावरून खाली टाकल्या. यावेळी पुरातत्त्व विभागच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच या आधी सुद्धा पुरातत्व विभागाला वेळोवेळी निवेदन देऊन कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हे आंदोलन पन्हाळा येथे करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष (उत्तर) संदीप यादव, जिल्हा संघटक निलेश सुतार, शहराध्यक्ष अभिजीत भोसले, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) रुपेश पाटील, अभिजीत कांझर, दत्तात्रय चौगुले, विश्वास गायकवाड, भगवान कोइंगडे, स्वप्निल यादव, युवराज जाधव, योगेश जगदाळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पन्हाळाचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, गोपनीय अंमलदार गणेश पाटील, विकास केर्लेकर, शिवाजी जाधव घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचलंत का ?  

Back to top button