पाणीप्रश्न सोडविण्यास कोल्हेंची साथ; कोपरगावकरांना मिळणार दिलासा | पुढारी

पाणीप्रश्न सोडविण्यास कोल्हेंची साथ; कोपरगावकरांना मिळणार दिलासा

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून कोल्हे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून नि:स्वार्थी भावनेने समाजसेवा करीत आहे. शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे कुटुंबियांनी मला मोलाची साथ दिली. युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी केले.

मंटाला म्हणाले, अनेक वर्षांपासून कोपरगावला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहरवासियांना कधी 8 तर कधी 15 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. गंभीर पाणीप्रश्न सोडविण्यास मी सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन डिजिटल स्वरुपात पाणी आंदोलन केले.
एकाच वेळी शहरातील हजारो नागरिकांनी पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, पाणी पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी आदींना ई-मेल पाठवले. या आंदोलनात माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांची साथ मिळाली. पंतप्रधान कार्यालयाने या डिजिटल पाणी आंदोलनाची दखल घेऊन शहराचा पाणीप्रश्न तत्काळ सोडविण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले.

या आंदोलनामुळे कोपरगाव शहराच्या पाणीप्रश्नाला गती मिळून पालिकेला निधी प्राप्त झाला. पाच-सहा वर्षांपासून पाणीप्रश्न सुटण्यासाठी लढा देत आहे. श्रेय कुणीही घेतले तरी आपल्याला प्रश्न सुटण्यासाठी काम करायला आवडते, असे मंटाला यांनी सांगितले.
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शहरात नागरिकांना नियमित शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी येसगाव शिवारात गोदावरी डावा कालव्याशेजारी नगर परिषदेच्या सर्व साठवण तलावासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी मिळवून दिल्या. या शेतकर्‍यांच्या मुलांना संजीवनी कारखान्यात नोकर्‍या दिल्या.

स्व. कोल्हे यांनी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळवून दिला. पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी सतत प्रयत्न केले. शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन त्यांनी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करून नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना व त्यासाठी लागणारा कोट्यवधींचा निधी मंजूर करवून आणला, ही वस्तुस्थिती असल्याचे राजेश मंटाला म्हणाले. दरम्यान, मंटाला यांनी पाणीप्रश्न संदर्भात केलेल्या या पाठपुराव्याचे कौतुक होत आहे.

हेही वाचा

Back to top button