चार महिने थांबा, मग मीच नमस्कार करतो : जयंत पाटील | पुढारी

चार महिने थांबा, मग मीच नमस्कार करतो : जयंत पाटील

नगर/सांगली, पुढारी वृत्तसेवा : प्रदेशाध्यक्ष बदलाची आवई अधूनमधून उठत असल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी (10 जून) सूचक वक्तव्य केले. सोशल मीडिया तसेच जाहीर भाषणांत बोलू नका, विधानसभा होईपर्यंत चार महिने थांबा. माझी प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत किती राहिली हे मोजत बसू नका, नोव्हेंबरमध्ये मीच नमस्कार करतो, असे त्यांनी स्वतःच जाहीर केले. नगर येथे पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आव्हान उभे करत शरद पवारांना बारामतीत अडकविण्याचा दिल्लीश्वरांचा डाव होता. पण पवारांनी तो उलटविला, असा गौप्यस्फोट करत जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांना बारामतीत अडकविण्याचा प्रयत्न झाला. पण पवारांनी अनेक निवडणुकांत अनेक डाव पाहिले आहेत. त्यांनी डाव उलटविला. आगामी काळात पवार हे नवोदितांना संधी देणार असल्याचे सूतोवाच पाटील यांनी केले. चार महिने कोणी ट्विटरवर बोलू नका. जाहीरपणे बोलू नका. तक्रार असेल तर ती शरद पवारांकडे मांडा. माझी काही चूक झाली असेल तर शरद पवार सांगतील ती शिक्षा भोगायला मी तयाार आहे, असेही ते म्हणाले.

मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. अनेकांनी माझे महिने मोजले. पण काळजी करू नका. मी काही मोदी, भाजपसारखी 400 पार करण्याची घोषणा करण्याची चूक करणार नाही. अंदाज लागू न देता विधानसभेचा निकाल लावणार, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

रोहित पवार यांच्या पोस्टवरून उत्तर?

जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी पक्षातील कुणीही सोशल मीडियावर किंवा जाहीरपणे पक्षांतर्गत तक्रारी करू नयेत, असे आवाहन कुणाचे नाव न घेता केले. परंतु आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडियावरून केलेली पोस्ट मात्र या निमित्ताने चर्चेत आली आहे. त्यात त्यांनी म्हटले होत की,राज्यात महाविकास आघाडीला मिळालेला विजय कुणा एकट्यामुळे नाही. शरद पवार, उध्दव ठाकरे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते व स्वाभिामानी जनतेच्या संघर्षाचा विजय आहे.काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधार्‍यांना भेटून काही सेटिंग करत नव्हते ना याचा शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ नये म्हणजे झाले. काही नेत्यांनी दोन दगडांवर पाय ठेवले आहेत. त्यांनी इकडे किंवा तिकडे थांबावे.

Back to top button