

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेतकरी सन्मान योजनेचा १७ वा हप्ता आज (दि. १८) जारी करण्यात आला आहे. वाराणशी येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्यासोबतच कृषी सखी महिलांच्या प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले.
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर शेतकरी सन्मान योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी करुन कामाला सुरुवात केली होती. या योजनेतील १७ व्या हप्त्याची सुमारे २० हजार कोटी रूपयांची रक्कम तब्बल ९ कोटी २६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा केली. कृषी सखी म्हणून प्रशिक्षित झालेल्या ३० हजाराहून अधिक बचत गट महिलांनाही पंतप्रधान प्रमाणपत्रांचे वितरण केले.
केंद्र सरकारने आतापर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे १६ हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. १६ वा हप्ता २८ फेब्रुवारी २०२४ रोजी हस्तांतरित करण्यात आला होता.