विखेंचा ‘संग्राम’ खरंच लढला, पण..! | पुढारी

विखेंचा ‘संग्राम’ खरंच लढला, पण..!

संदीप रोडे

नगर : महायुतीचे उमदेवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी असलेला ‘यारी’ नगर शहर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मनापासून निभावली. लोकसभा निवडणूक समन्वयक असतानाही नगर शहरात सुजय विखेंच्या विजयासाठी आ.जगताप यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली, पण त्यानंतरही 2019 च्या तुलनेत विखेंचे मताधिक्य घटले. अर्थात भाजप पक्षांतर्गत हेवेदावे, कुरघोड्या त्यामागील कारण असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

२०१९ चा इतिहास

2019 च्या लोकसभा निवडणुकीत आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील एकमेकांविरोधात लढले होते. त्यावेळी शरद पवार यांनी आमदार असलेले संग्राम जगताप यांना बळजबरीने उमेदवारी गळ्यात मारली. शरद पवारांनी विखेंसाठी काँग्रेसला जागा न सोडल्याने ते भाजपात गेले अन् उमेदवारी मिळविली. शरद पवारांचा शब्द प्रमाण मानून 2019 ची निवडणूक आ. जगताप यांनी मनापासून लढविली, पण घरातूनच म्हणजे नगर शहरातून आ. जगताप यांना पिछाडी मिळाली. त्यावेळी विखेंना नगर शहरातून 53 हजार 122 मतांचे लीड मिळाले होते. इतकेच काय तर लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघात विखेंना मताधिक्य मिळाले. निवडणूक संपली तशी विखे-जगताप यांनी राजकीय हेवेदावे बाजुला ठेवत मैत्रीचा धागा गुंफला. पुढे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादीत फुट पडली. आ. जगताप हे अजित पवारांसोबत गेले. शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजप अशी महायुती सत्तेत आली. त्यातून विखे-जगताप यांच्या मैत्रीचा धागा अतूट अन् पक्का झाला.

अवघ्या 31 हजार 588 मताधिक्यावर समाधान

पुढे विखेंच्या विजयाची सगळी धुरा आ. जगताप यांच्या खांद्यावर पडली. मैत्री आणि पक्षीय संकेत पाळत आ. जगताप यांनी नगरमधून विखेंना मताधिक्य मिळावे, यासाठी मनापासून प्रयत्न केले. व्यापारी, उद्योजक, विविध समाजाच्या बैठका घेतल्या. त्यातून त्यांना विकासाचा शब्द दिला. मात्र त्यातून अपेक्षित असे मताधिक्य मिळू शकले नसल्याचे आकडे निकालानंतर समोर आले. नगर शहरात 1 लाख 88 795 मतदान झाले. मतमोजणीनंतर त्यातील 1 लाख 5 हजार 849 मते विखेंना मिळाली. मात्र नीलेश लंके यांनीही नगरवर लक्ष केंद्रीत केल्याने त्यांना 74 हजार 263 मते मिळाली. अवघ्या 31 हजार 588 मताधिक्यावर विखेंना समाधान मानावे लागले. नेमक्या प्रचाराच्या रंगतदार काळातच जातीय समीकरणे मांडली गेली, त्याचा फायदा लंके यांना झाला. लंके यांनी मिळालेल्या या मतांमुळे विखेंचा नगर शहरातून मताधिक्य 53 हजारांवरून 31 हजारापर्यंत कमी करण्यात यश मिळविले. परिणामी लंके यांचा विजय सुकर झाला.

विखेंचे उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपांतर्गत हेवेदावे चव्हाट्यावर येवू लागले. विखेंनी जाहीरपणे माफीनामा सादर केला. मात्र हाच माफीनामा त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला की काय? अशी स्थिती घटलेल्या मताधिक्याने निर्माण केली. पक्षांतर्गत असलेले हेवेदावे, कुरबुरी विखेंनी मिटविल्या, पण त्यातच त्यांची एनर्जी वाया गेली. पक्ष संघटनेवरून निसटलेली पकड विखेंनी घट्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले असे म्हणण्याचे धाडस घटलेल्य मताधिक्यांवरून कोणी करणार नाही, हे तितकेच खरे!

हेही वाचा 

Back to top button