हिंदुत्व सोडल्यानेच ठाकरेंवर ही वेळ : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

हिंदुत्व सोडल्यानेच ठाकरेंवर ही वेळ : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नगर : पुढारी वृत्तसेवा : धर्माचा, देवादिकांचा आज अवमान होतोय. याचा जाब विचारण्याऐवजी जितेंद्र आव्हाड, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासह औरंगजेबाच्या कबरीवर फुले उधळणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसतात. त्यांनी आपले हिंदुत्व नेमके कोणते हे सांगाव. हिंदुत्व सोडल्यानेच त्यांच्यावर ही वेळ आली. लोकसभेनंतर त्यांच्याकडे असलेली शिल्लक सेनाही राहणार नाही, अशी जोरदार टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी (दि. 14) केली.

नगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनीका राजळे आदी उपस्थित होते. इंडिया आघाडीने कितीही वल्गना केल्या तरी मोदीच पंतप्रधान होणार आहेत. विरोधकांमध्ये एकमत होत नसल्याने दोनवेळा बैठकाही पुढे ढकलल्या आहेत.

ज्या झाल्या त्या देखील केवळ पर्यटन म्हणून दिसल्या. ज्यांना आपली खुर्ची सांभाळता आली नाही, आमदार सांभाळता आले नाहीत, अशी बाद झालेली मंडळी एकत्र आली आहे. तीन राज्यांच्या निकालातून जनतेनेच या विरोधकांच्या डोळ्यात अंजन घातले आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जनता पुन्हा एकदा मोदींच्या मागे खंबीरपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तलाठी परीक्षेत कोणताही घोटाळा झालेला नाही, याबाबतचा खुलासा करताना ज्यांनी बेछूट आरोप केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button