बेळगाव : आई घरी परत ये.. प्रियकरासोबत पळून गेलेल्या जन्मदात्रीला तीन मुलांची आर्त हाक

बेळगाव : आई घरी परत ये.. प्रियकरासोबत पळून गेलेल्या जन्मदात्रीला तीन मुलांची आर्त हाक

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : चाळीशीतल्या विधवा महिलेला तीन मुले… यातील मोठा मुलगा 19 वर्षाचा… तिला या वयात एकावर प्रेम जडले… तिन्ही मुलांना सोडून ती प्रियकरासोबत पळून गेलीच पण, जाताना तिने पतीची अनुकंपा तत्वावरील सरकारी नोकरीही घेऊन गेली. आता ही मुले वार्‍यावर पडली असून आमची आई आम्हाला मिळवून द्या म्हणत पोलीस ठाण्यात जात आहेत, तर आई म्हणते मी जाणार नाही, त्यामुळे सगळाच पेच निर्माण झाला आहे.

महिन्याभरापूर्वी ज्या गणेशपूर परिसरात एका 40 वर्षाच्या महिलेने गुपचूपरित्या 90 वर्षाच्या वृद्धाशी नोंदणी पद्धतीने विवाह केला, त्याच गणेशपूर परिसरातील दुसरी एक कहाणी सध्या चर्चेत आहे.

गेल्या मे महिन्यात कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूर परिसरातून एक महिला बेपत्ता झाली होती. तशी फिर्याद सदर महिलेचे दीर व मुलांनी दिली. पोलिसांनी तिचा जेव्हा शोध घेतला तेव्हा वेगळीच कहाणी समोर आली. या महिलेच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी निधन झालेले आहे. या महिलेला 10, 15 व 19 वर्षांची तीन मुले आहेत. पतीच्या निधनानंतर ओळखीच्या व सातत्याने तिच्या घरी येणार्‍या एका समवयस्क प्रियकरासोबत ती पळून गेल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस ठाण्यात मिटवले पण…

सदर महिलेला जेव्हा पोलिस ठाण्यात आणले तेव्हा त्या महिलेचे दोघे दीर, नणंदा, तिची तीन मुले व या महिलेचे भाऊ सर्वजण तेथे आले. विशेष म्हणजे या महिलेचा पती आरोग्य खात्यात ग्रुप डीमध्ये सरकारी नोकर होता. त्याच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर पत्नीला नोकरी मिळाली आहे. परंतु, नोकरीवर रूजू होताच ती या तरुणासोबत पळून गेली. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने घरी परत येणार नसल्याचे सांगितले. यावर तोडगा म्हणून तिला जो पगार मिळणार आहे, त्याच्यातील 75 टक्के भाग तिने मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा, असे ठरले. यानंतर गेल्या दिड-दोन महिन्यांपासून हे प्रकरण शांत होते.

नोकरीवरून गायब अन्…

सदर महिला घरी न येता त्या तरुणासोबतच राहात होती. परंतु, अचानक तिने कामावर देखील जाणे बंद केल्याचे समोर आले. त्यामुळे तिच्या सासरच्या लोकांनी व मुलांनी पुन्हा पोलिस ठाणे गाठले आणि भरपाईची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार केली. तसेच ही महिला कुठे आहे, याबाबतही काही माहिती नाही, असे सांगितले. यानंतर पुन्हा कॅम्प पोलिसांनी त्या महिलेला शोधून तिला व सासरच्या लोकांना बोलावून घेतले. कुटुंबियांनी व मुलांनी तिला पुन्हा घरी येण्याचा अग्रह धरला. परंतु, तिने नकार दिला. आपण प्रियकरासोबत राहणार असून आपल्याला कोणी त्रास देऊ नये, याची काळजी घेण्याची विनंती तिने पोलिसांना केली. यानंतर मुलांनी मात्र आमची आई आम्हाला परत द्या, आम्ही शाळा सोडून कामाला जातो अन् तिला जगवतो. पण, तिला आमच्यासोबत यायला सांगा, अशी विनंती पोलिसांना करत राहिले. पण महिला तिच्या निर्णयावर ठाम असल्याने पोलीसही हतबल झाले. या महिलेला माध्यम प्रतिनिधींनीही तीन मुलांना सोडून जाणे कितपत योग्य आहे, त्यांची चिंता वाटत नाही का? असे विचारले असता मी काय करायचे हा माझा वैयक्तीक प्रश्न आहे, तुम्ही कोण विचारणार, असे म्हणत तिने सर्वांनाच उडवून लावले. एकंदरित प्रेमात अकंठ बुडालेली ही तीन लेकरांची आई सध्या तरी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.

म्हणे प्रियकरही गुंड प्रवृत्तीचा

ज्या तरुणासोबत ती पळून गेली आहे, तो देखील गुंड प्रवृत्तीचा असल्याचे तिच्या सासरच्या लोकांचे म्हणणे आहे. एका महिलेच्या छेडछाड प्रकरणात त्याला महिलेने मारल्याचा व्हिडिओ पोलिसांना दाखवला. सदर महिलेलाही तो तरुण तिच्यासाठी योग्य नाही, हे कुटुंबियांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news