ऊस दरवाढीच्या वादाचे बॉयलर पेटण्याचे संकेत | पुढारी

ऊस दरवाढीच्या वादाचे बॉयलर पेटण्याचे संकेत

गोरक्ष शेजूळ

नगर : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या यंदाच्या गाळप हंगामासाठी कारखान्यांची तयारी पूर्ण झालेली आहे. मात्र उसाचा तुटवडा आणि बाजारातील साखरेचे वाढते दर पाहता यंदा टनाला किमान पाच हजार रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. नेवाशातील ऊस उत्पादकांच्या परिषदेनंतर साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमधील ऊसदर वादाचे बॉयलर आणखी पेटणार असल्याचे संकेत आहेत. जिल्ह्यात 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याच्या हालचाली आहेत. यंदा गाळपासाठी उसाचे क्षेत्र कमी आहे.

संबंधित बातम्या :

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी किमान 50 हजार हेक्टर घट झाल्याचे साखर आयुक्त कार्यालयाचे आकडे सांगत आहेत. त्यामुळे या गाळपासाठी साधारणतः 1 लाख 11 हजार हेक्टरवरील ऊस उपलब्ध असणार आहे. यातही उन्हाळ्यातील चार्‍याच्या टंचाईत ऊस चारा म्हणून भाव खाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा 21 कारखान्यांना प्रत्यक्षात गाळपासाठी ऊस मिळविणे जिकिरीचे बनणार आहे. अशातच ज्या कारखान्यांना ऊस हवा आहे, त्यांनी शेतकर्‍यांना प्रतिटन पाच हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केल्याने कारखानदारांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. या मागणीला ऊस उत्पादकांनीही उचलून धरले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न भडकणार असल्याचेही चित्र आहे.

यंदा शेतकर्‍यांची ‘गेटकेन’ दिवाळी!
उसाचे क्षेत्र कमी आहे. त्यातच बहुतांश कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढविलेली आहे. त्यामुळे कारखाने सुरू ठेवण्यासाठी कारखानदारांकडून उसाची मोठी पळवापळवी होणार आहे. यात शेतकरीदेखील जो कारखाना जास्त भाव देणार, त्यालाच ऊस देण्याच्या मानसिकतेत आहेत. यातून या वर्षी काटा पेमेंट (गेटकेन) करण्याची वेळ कारखानदारांवर येणार आहे. शिवाय ऊसदरदेखील तीन-साडेतीन हजारांपेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांची यंदा खर्‍या अर्थाने ‘दिवाळी’ होईल, असेच संकेत आहेत.
एकाही कारखान्याला

गाळप परवाना नाही
नगरमधील कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले आहेत. नगरमधून त्यातील त्रुटी दूर करून ते पुढे पाठविलेले आहेत. मात्र रविवारपर्यंत साखर आयुक्त कार्यालयाकडून एकाही कारखान्याला अधिकृत गाळप परवाना मिळालेला नसल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

पाच हजारांचे गणित!
रघुनाथदादा पाटलांनी टनाला पाच हजारांची मागणी केली आहे. त्यासाठी सध्या साखरेचे दर चार हजार रुपयांच्या आसपास आहेत. गाळपात सरासरी 12.5 टक्के साखर उतारा धरला तर एक टनाला 125 किलो साखर पडते. त्यानुसार टनाचे चार हजार आणि वरील 25 किलोचे एक हजार रुपये, असे साखरेपासूनच पाच हजार कारखान्यांना मिळतात. भुसा टनाला चार हजाराने वीटभट्टीवाले खरेदी करतात. एका टनाला 300 किलो भुसा निघतो, त्याचे 1200 रुपये येऊ शकतात. 600 रुपये मळीचे होतात. याशिवाय इथेनॉल, मद्यार्क, सहवीज प्रकल्प, स्पिरीट याचा हिशेब वेगळाच आहे. यातून कारखान्यांना आपला खर्च भागवता येऊ शकतो, असाही आधार घेण्यात येत आहे.

Back to top button