शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू ; आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित | पुढारी

शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू ; आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  शेततळ्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याप्रकरणी तालुक्यातील आल्हणवाडी येथील आश्रमशाळेचे मुख्याधापक व वसतिगृहाचे अधीक्षक यांना हलगर्जीपणा केल्याने निलंबित करण्यात आले आहे. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी निलंबनाची कारवाई केली असून या आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या आश्रमशाळेत शिकत असलेली पायल संदीप पांढरे (वय 9) व सूरज संदीप पांढरे (वय 8) हे दोघेही सख्खे बहीण-भाऊ शुक्रवारी दुपारी शाळेच्या मधल्या सुट्टीत शाळेच्या पाठीमागे असलेल्या शेततळ्याकडे गेले होते.

त्यानंतर दुपारी या दोघांचेही मृतदेह शेततळ्यात आढळून आले. शाळेतील शिक्षक व वसतिगृहाचे अधीक्षक यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत पांढरे कुटुंबियांनी करत, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे घटनास्थळी मुख्याधापक व अधीक्षक फिरकले सुद्धा नसल्याने, पांढरे यांचे नातेवाईक चांगलेच संतप्त झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत शनिवारी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देवढेे यांनी आश्रमशाळेला भेट देऊन चौकशी केली. शाळेचे मुख्याधापक दादासाहेब म्हस्के व वसतिगृहाचे अधीक्षक ज्ञानदेव कर्डिले या दोघांनी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी म्हस्के व कर्डिले या दोघांना तातडीने निलंबित केले आहे. सदरची आश्रमशाळा श्री छत्रपती शिवाजी संस्थेमार्फत चालविली जात आहे. ही संस्था अनुदानित असून, या संस्थेची मान्यता रद्द करावी, असा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठविणार असल्याचे देवढे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button