Nagar News : उसाला भावासह सभासदांना मोफत साखर; आ. बाळासाहेब थोरात | पुढारी

Nagar News : उसाला भावासह सभासदांना मोफत साखर; आ. बाळासाहेब थोरात

पुणतांबा; पुढारी वृत्तसेवा : दुष्काळामुळे उसाचा तुटवडा आहे. गणेश बंद व्हावा, यासाठी टोकाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र तरीही परमेश्वराच्या आशीर्वादाने धुराडे पेटले. इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला योग्य भाव दिला जाईल. सभासदांची दिवाळी गोड व्हावी या भूमिकेतून सर्व सभासदांना 10 किलो साखर मोफत दिली जाईल, अशी घोषणा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केली. श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक भैय्या कोल्हे, श्रीगणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, व्हा. चेअरमन विजय दंडवते, ज्येष्ठ नेते एकनाथ गोंदकर, प्रभाताई घोगरे, सुधीर म्हस्के, शिवाजी लहारे, गंगाधर चौधरी आदींसह पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, बॉयलर होवूच नये, यासाठी पराकोटीचे प्रयत्न झाले. मोठी अडथळ्यांची शर्यत सुरू आहे. आचारसंहिता असताना बेकायदेशीररित्या करार केला गेला. आता त्या कराराची भोकाडी दाखवून गणेश कारखान्याला कुठूनही आर्थिक मदत मिळू नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा बँकेने मंजूर केलेले कर्ज नाकारले. गाळप परवान्यासाठी अर्ज केला, त्यामध्ये देखील या कराराची आडकाठी आणली गेली असे सांगत, आ. थोरात म्हणाले, विश्वास बसणार नाही, मात्र प्रवरा कारखान्याने गणेश कारखान्याकडून 81 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

हा आकडा दररोज वाढतो आहे. आपण अंतर्गत लेखापरीक्षण केलं, त्यांनीच नियुक्त केलेल्या शासकीय लेखापरीक्षकाकडूनही लेखापरीक्षण करून घेतलं, हा आकडा कोठेही जुळायला तयार नाही. हे 81 कोटी नेमके आले कुठून? असा सवाल करीत ते म्हणाले, गणेश परिसरामध्ये ऊस उत्पादकांवर वेगळ्या प्रकारची दहशत सुरू झाली आहे. उसाची नोंद आमच्याकडे करा, अन्यथा कर्ज मिळणार नाही. गणेशला ऊस घातला तर रस्त्यासह बांधाचे प्रश्न तयार होतील, असे इशारे सभासदांना काही मंडळी देत आहेत, परंतु सभासदांचे कौतुक करावेसे वाटते की, त्यांनी या कोणत्याही धमकीला भिक घातली नाही.

गणेशच्या शेतकी विभागाच्या कर्मचार्‍यांवर प्रयोग झाले, मात्र ते कर्मचारी सुद्धा श्री गणेश सहकारी कारखाना सोबत निष्ठेने उभे आहेत.
‘गेली 7-8 वर्षे या परिसरामध्ये पाण्याची उपलब्धता होती, ऊस होता. अशा काळात खरेतर चांगले गाळप व्हायला पाहिजे होते, ते गाळप का झाले नाही, आम्ही तर अडचणीच्या काळात आलो. नैसर्गिक संकटांच्या जोडीने, राजकीय संकटेपण आहेत, तरीही आम्ही कारखाना चालवण्यास पुढाकार घेतोय. परमेश्वर कृपेने त्यात आम्हाला यश मिळाले. याचा अर्थ ‘त्यांचा’ हेतूच चांगला नव्हता.

8 वर्षात त्यांनाही संस्था चालवायची नव्हती, बंद पाडायची होती, हडप करायची होती, असा आरोप आ. थोरात यांनी केला. विवेक कोल्हे म्हणाले, अनेकांना प्रश्न होता, बॉयलर होईल की नाही, ज्यांच्या मनात शंका होती, पण त्यांना आज उत्तरे मिळाली. आज धुराडे पेटले. या परिसराची दिवाळीसुद्धा गोड होईल. जायकवाडीस पाणी सोडण्याचा प्रश्न गंभीर पातळीवर गेला. नगर व नाशिक जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती असल्याने लढावे लागणार आहे.

उद्घाटन कोणीही करो, माझे जीवन सार्थक झाले!

निळवंडे धरण अन् कालव्यांचे उद्घाटन कोण करते, हा प्रश्न दुय्यम आहे. शेतकर्‍यांच्या जीवनात आनंद निर्माण होणे, हा महत्त्वाचा भाग आहे. दुष्काळी भागाला पाणी मिळाले, माझे आजवरचे प्रयत्न फळाला आले, माझे जीवन सार्थकी लागले, असे मी समजतो, आ. थोरात म्हणाले

राजकीय संकटांचादेखील सामना करणार आहोत

गणेश कारखान्यावर काही आसमानी तर काही राजकीय संकटे आली. सभासद व शेतकर्‍यांचा आशीर्वादामुळे या संकटातून बाहेर पडू, आमची भूमिका गणेश कारखाना वाचविण्याची आहे, सभासदांनी गणेशच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी सभासदांना केले.

हेही वाचा

Yavatmal News | विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवर एसटी बस पेटवली, ७३ प्रवासी भयभीत

कोल्हापूर: घाटकरवाडी येथे हत्तीच्या हल्ल्यात वनमजूर ठार

Nagar News : नगरचा मल्ल महाराष्ट्र केसरी होईल : आमदार जगताप

Back to top button