Yavatmal News | विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवर एसटी बस पेटवली, ७३ प्रवासी भयभीत | पुढारी

Yavatmal News | विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवर एसटी बस पेटवली, ७३ प्रवासी भयभीत

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा, नांदेड येथून नागपूरसाठी निघालेल्या एसटी बसला दोन मोटरसायकलवरून आलेल्या चार अज्ञातांनी अडविले. याशिवाय पाठीमागून आलेल्या पाच-सहा अज्ञातांनी बसची तोडफोड करून पेट्रोल टाकून पेटवून दिले. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदी पुलावर गोजेगावजवळ घडली. (Yavatmal News)

संबंधित बातम्या 

नांदेड आगाराची एमएच २० जीसी ३१८९ ही बस शुक्रवारी रात्री नांदेड येथून नागपूरकडे जात होती. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हदगाव – उमरखेड दरम्यान गोजेगाव जवळील पैनगंगा नदी पुलाजवळ येताच त्या ठिकाणी दोघांनी मोटरसायकल आडवी लाऊन बस थांबविली. त्यानंतर पाठीमागून आलेल्या ५ ते ६ अज्ञात व्यक्तींनी बसमध्ये असलेल्या ७३ प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. पाठीमागून आलेल्या अज्ञात इसमांनी काठीने बसच्या काचा फोडल्या व बसच्या टायरवर पेट्रोल टाकून आग लावली. या आगीत बस जळून खाक झाली. यामध्ये बसचे सुमारे ३२ लाखांचे नुकसान झाले.

बसचालक बी. डी नाईकवाडे यांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलीस पथक अग्निशामक दलासह घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. घटनास्थळी नांदेड व यवतमाळ विभाग नियंत्रक, उमरखेड आगाराचे व्यवस्थापक प्रकाश भदाडे यांनी भेट देऊन प्रवाशांना पर्यायी बसची व्यवस्था करून नागपूरकडे रवाना केले. (Yavatmal News)

हे ही वाचा :

Back to top button