पद्मश्री सन्मान; पोपटराव पवार यांनी कसा बदलला हिवरेबाजारचा चेहरामोहरा? | पुढारी

पद्मश्री सन्मान; पोपटराव पवार यांनी कसा बदलला हिवरेबाजारचा चेहरामोहरा?

नितीन देशमुख

हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर दै. ‘पुढारी’ने त्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. मुलाखतीत त्यांनी सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीविषयी आपले मत मांडले.

  • सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत आपले काय मत आहे?

पोपटराव पवार : सध्या गल्ली ते दिल्ली पर्यंत राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. पूर्वी यशवंतराव चव्हाणांचा आदर्श ठेवत लोक राजकारणात यायचे. त्यावेळी राजकारण व समाजकारण दोन्हीही क्षेत्रे वेगवेगळी होती. आता कलंकित प्रतिमा असलेल्या परंतू निवडून येण्याची क्षमता असणाऱ्याला राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. निवडणुकांमध्ये पैसाही खूप खर्च होतो. चांगली माणसं या नव्या राजकीय नेत्यांच्या व्याख्येत बसत नाही. विधीमंडळात समाजहिताचे प्रश्न मांडून ते सोडवणारे अभ्यासू राजकीय नेते प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये अपयशी होताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधींकडून विकासाचा दृष्टिकोन ठेवण्यापेक्षा लग्न समारंभाला हजेरी लावणे, बारसे, दशक्रियाविधीच्या कार्यक्रमांना महत्व दिले जाते. मतदारांची मर्जी सांभाळण्यातच लोकप्रतिनिधींचा जास्त वेळ जातो. यापुढील काळात राज्यकर्त्यांनी अभ्यास करून धोरण आखण्याची गरज आहे. सामाजिक समस्येवर सर्वच राजकीय पक्षांचे एकमत होण्याची गरज आहे.

  • ग्रामीण विकासात आपण दिशादर्शक काम केले आहे. हे कौशल्य कसे प्राप्त झाले?

बालपणापासून निसर्गाच्या सहवासात वाढलो. लहानपणी गावातील सामाजिक परिस्थिती बिघडलेली होती. आपले गाव सुधारले पाहिजे असे मनोमन वाटत होते. दरम्यानच्या काळात सरपंचपदाची संधी मिळाली आणि काम सुरू केले. गावातील विकास कामासाठी कुठलीही योजना आणायची असली तर राजकीय नेत्यांच्या पत्राची, शिफारशीची गरज होती. म्हणून स्वतः 1992 साली नगर तालुका पंचायत समितीची निवडणूक लढवून विजयी झालो. पुढे राजकारणापेक्षा समाजकारणाचे क्षेत्र निवडले. त्यानंतर गावाच्या विकासासाठी झोकून देऊन कामास सुरुवात केली.

  • हिवरेबाजार गावात विकासाचे पहिले काम कोणते केले?

तीस वर्षांपुर्वी हिवरेबाजार गावात कमालीचे दारिद्रय होते. गावाच्या सीमेवरील पिंपळगाव वाघा गावात इंडो-जर्मन योजनेवर गावातील मजूर कामासाठी जात होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आदर्श ठेवत प्रेरणा घेतली. गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय योजनांचा अभ्यास सुरू केला. वनविभागाचे पहिले काम सुरु केले. प्रचंड बेकारीमुळे दोन महिने चालणारे काम पंधरा दिवसात संपले. नंतर कृषी योजनांचा अभ्यास करून नालाबंडिंगचे काम सुरू केले. १९९५ साली यशवंत कृषी व पाणलोट योजना या संस्थेची स्थापना करून जलसंधारणाची कामे केली. विशेष म्हणजे त्या काळी मजुरीसाठी शेजारच्या गावात जाणारे हिवरेबाजारचे ग्रामस्थ आता जलसंधारणाच्या कामांमुळे दुस-या गावातील मजुरांना रोजगार देत आहेत. आर्थिकदृष्ट्या सधन झालेल्या हिवरेबाजारच्या शेतकऱ्यांचे प्राध्यापकांच्या पगाराप्रमाणे दरडोई उत्पन्न वाढले आहे.

  • तुम्ही राजकारण केले असते तर काय झाले असते. याचा तुम्हाला फायदा झाला असता की तोटा?

राजकारण केले असते तर फायदाच झाला असता. आता त्याची खंत वाटत नाही. सन १९९५ साली माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी त्यावेळच्या नगर-नेवासा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सुचना केली होती. गावाचा विकास करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने राजकारणाऐवजी समाजकारण करण्याचा निर्णय घेतला.

  • अण्णा हजारेंना तुम्ही गुरु मानता. कामाची सुरुवात कशी झाली?

अण्णा हजारे यांनी प्रशासन व राजकारण विरहित समाजासाठी मोठे काम केले. समाजाप्रती केलेल्या कार्यातून जगापुढे एक आदर्श ठेवला. त्यातूनच निस्वार्थी काम करण्याची प्रेरणा घेतली. माजी जिल्हा परिषद सदस्य दिवंगत जगन्नाथ पाटील दळवी यांच्याकडून सामाजिक विकास व ग्रामविकासाचे धडे घेतले. कुटुंबातून मिळालेले पाठबळ. गावातील प्रत्येक व्यक्तीने केलेले श्रमदान. पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना या भावना मनात उचंबळून येत होत्या.

  • गावातील परिस्थिती हाताळतांना युवा राजकीय नेत्यांना तुम्ही काय संदेश द्याल?

राजकीय व सामाजिक क्षेत्रात कितीही प्रामाणिकपणे काम केले तरी सत्याच्या परीक्षेत उतरावेच लागते. त्रास होतोच. आजकालचे तरुण नेते वेगाने राजकारणात येतात अन् तितक्याच वेगाने संपूनही जातात. राजकारण व समाजकारणात टिकायचे असेल तर संयम ठेवावा लागेल. अपमान सहन करायची तयारी ठेवावी लागेल. विरोधकांमुळे चुका दुरुस्त करण्याची संधी मिळते. प्रामाणिक विरोधकांच्या आरोपांचीही दखल घ्यावी.

  • जगाला भेडसावणाऱ्या ग्लोबल वार्मिंगबद्दल काय सांगाल?

जागतिक स्तरावर उपलब्ध पाण्याचे नियोजन व त्यावर आधारित पीक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. पूर्वी यशवंतराव चव्हाण म्हणायचे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. आता सह्याद्रीमुळे हिमालय अडचणीत येऊ लागलाय. सह्याद्रीच्या घाटमाध्यावरील वृक्षतोड, पर्यावरण असंतुलनामुळे संपुर्ण आशिया खंडात त्याचे पडसाद उमटू लागले आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दरडी कोसळणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. सह्याद्री वाचवण्याची गरज आहे.

गावातील गावपण टिकवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?

गावागावात शेतीच्या बांधावरून मोठ्या प्रमाणात भांडणे होतात. गावातील ग्रामपंचायत व सोसायटी निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतात. निवडणुका वाद चिखळवायचे माध्यम होते. गावातील भांडणे पोलिस स्टेशन, कोर्टात गेली की सामाजिक वातावरण बिघडते. प्रशासनाने जर गावागावातील जमिनींची मोजणी केली तर गावागावातील अनेक वाद मिटतील.

  • पोपटराव पवार

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : …आणि या गावाच नाव अपशिंगे मिलिटरी पडलं

Back to top button