राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ८ नोव्हेंबरला विविध क्षेत्रातील ११९ व्यक्तींना त्यांच्या योगदानाबद्दल पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात कर्नाटकात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ७२ वर्षाच्या तुलसी गौडा (Tulsi Gowda) यांचा समावेश होता. राष्ट्रपतींच्याहस्ते पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी तुलसी गौडा पारंपरिक पोषाकात आल्या होत्या. त्या अनवाणी पायाने पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे आल्या. याचवेळी एक फोटो घेण्यात आला आणि हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हात जोडून तुलसी यांचे स्वागत करताना दिसतात. यावेळी तुलसी यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला.
तुलसी गौडा या कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होन्नाळी गावच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९४४ मध्ये हक्काली आदिवासी कुटुंबात झाला. त्या केवळ २ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. खेळण्या बागडण्याच्या वयातच तुलसी यांना नर्सरीत रोजंदारीवर काम करावे लागले. त्यांची घरची परिस्थिती गरीब होती. त्यांनी नर्सरीत ३५ वर्षे काम केले. त्या गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरणासाठी काम करत आहेत. त्यांनी वयाच्या ७० वयापर्यंत वनविभागाच्या नर्सरीची देखभाल केली. त्यांनी ३० हजार पेक्षा झाडे लावली आहेत. त्या शाळेत गेल्या नाहीत. पण वनस्पती आणि वनौषधींचे त्यांचे ज्ञान मोठे आहे. यामुळे त्यांना 'इनसायक्लोपिडीया ऑफ फॉरेस्ट' (encyclopedia of the forest) आणि वनदेवी (tree goddess) म्हणून ओळखले जाते. पर्यावरण संरक्षण तसेच बियाणांची गुणवत्ता ओळखण्याचे त्यांचे ज्ञान मोठ्या शास्त्रज्ञांनी आत्मसात केले आहे. पर्यावरण संरक्षणासाठी त्यांचे योगदान अतुलनीय असून त्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तुलसी यांनी पर्यावरण संरक्षणासोबतच त्यांच्या गावातील महिलांच्या अधिकारांसाठी काम केले. त्याच्या समाजातील एका महिलेला बंदुकीचा धाक दाखवून धमकावले जात होते. त्यावेळी तुलसी त्या महिलेच्या मदतीसाठी धावून गेल्या. त्यांनी त्यावेळी जर गुन्हेगाराला शिक्षा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
नव्या पिढीने जंगलाच्या देखभालीकडे लक्ष द्यावे, यासाठी त्या कार्यरत आहेत. बियाणे विकास आणि संर्वधनासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा याआधी इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. १९९९ मध्ये कर्नाटक राज्योत्सव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.