अनवाणी पायाने पद्मश्री स्विकारणारे संत्री विक्रेते हजाब्बा आहेत तरी कोण? | पुढारी

अनवाणी पायाने पद्मश्री स्विकारणारे संत्री विक्रेते हजाब्बा आहेत तरी कोण?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आज पद्म पुरस्कार सोहळ्यावेळी हारेकाला हजाब्बा या नावाची घोषणा झाली. नावाच्या घोषणेवरुनच हे नाव कर्नाटकातील आहे हे समजले. मात्र त्यांनंतर राष्ट्रपती भवनातील रेड कार्पेटवरून चालत येणारा मनुष्य पाहिला त्यावेळी सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या. सेलिब्रेटींच्या उपस्थितीने चकचकणाऱ्या राष्ट्रपती भवनात एक साधासुधा मनुष्य पांढरी लुंगी नेसलेला अनवाणी पायाने मुलायम रेड कार्पेटवरुन चालत येत होता.

त्यामुळे आपसूकच या साध्यासुध्या मानसाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. हारेकाला हजाब्बा यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांना शिक्षण क्षेत्रात आपले बहूमुल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना नागरी पुरस्कार देण्यात आला. त्यांना आपल्या गावात शाळा सुरु करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हजाब्बा हे अशिक्षित आहेत. ते आपला उदरनिर्वाह संत्री विकून करतात. मात्र या आपल्या तुटपुंज्या कमाईतूनही त्यांनी आपल्या गावात शाळा उभारण्यासाठी आपले योगदान दिले.

हजाब्बा यांना २५ जानेवारी २०२० मध्येच पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली होती. मात्र कोरोनामुळे पुरस्कार सोहळा आयोजिक करण्यात आला नाही. नंतर त्यांना मार्चमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ताक्षराचे प्रशस्तीपत्र देण्यात आले. मात्र पुरस्कार देण्याचा सोहळा होऊ शकला नव्हता. अखेर तो आज राष्ट्रपती भवनात पार पडला.

एका विदेशी नागरिकामुळे शाळा बांधण्याचा चंग बांधला : हजाब्बा

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर संत्री विकणाऱ्या हजाब्बा यांनी सांगितले की, ते मंगळुरु बस डेपोच्या बाहेर १९७७ पासून संत्री विकत आहेत. ते अशिक्षित आहेत ते कधीही शाळेत गेले नाहीत. मात्र १९७८ मध्ये त्यांना एका विदेशी नागरिकाने संत्र्याची किंमत विचारली. मात्र शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना त्याच्याशी संवाद साधता आला नाही. तेव्हा त्यांनी ठरवले की आपण आपल्या गावात शाळा बांधायची.

ते पुढे म्हणाले की, ‘मला फक्त कन्नडच येत होती. इंग्रजी आणि हिंदी येत नव्हती. त्यामुळे मला त्या विदेशी नागरिकाला काही सांगता आले नाही. त्यानंतर मी माझ्या गावात शाळा बांधण्याचे ठरवले.’

हजाब्बा यांचे हे शाळा बांधण्याचे १९७८ साली पाहिलेले स्वप्न दोन दशकानंतर पूर्णत्वास येऊ लागले. अक्षर संत या उपाधीने ओळखले जाणाऱ्या हजाब्बा यांनी माजी आमदार कैलासवासी युटी फरीद यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी २००० मध्ये त्यांना शाळा बांधण्यासाठी परवानगी दिली. हजाब्बा यांची शाळा २८ विद्यार्थ्यांना घेऊन सुरु झाली आता त्यांच्याकडे १० वी पर्यंतच्या वर्गात एकूण १७५ विद्यार्थी आहेत.

हेही वाचा :  

आता हजाब्बा विविध पुरस्कारांची मिळालेली रक्कम गावात अजून शाळा सुरु करण्यासाठी वापरणार आहे. ६६ वर्षांच्या या संत्री विक्री करणाऱ्या हजाब्बा यांना विचारण्यात आले की आता पुढे काय करणार तेव्हा ते म्हणाले, ‘माझे पुढचे ध्येय माझ्या गावात अजून शाळा आणि कॉलेज बांधण्याचे आहे. अनेक लोकं मला देणग्या देत आहे. मी या देणग्या शाळा कॉलेज बांधण्यासाठी लागणारी जागा विकत घेण्यासाठी वापरणार आहे.’

ते पुढे म्हणाले की, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनात्यांनी माझ्या गावात ज्युनियर कॉलेज बांधावे अशी विनंती केली आहे.’ याचबरोबर हजाब्बा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार नलिन कुमार कटील, जिल्ह्याचे पालकमंत्री कोटा श्रीनिवास पुजारी आणि आमदार युटी खादर यांचे आभार मानले.

Back to top button