Nagar News : दक्षिणेची मळमळ अन् विखे डॉक्टरांचं औषध! वर्‍हाड निघालं उत्तरेला! | पुढारी

Nagar News : दक्षिणेची मळमळ अन् विखे डॉक्टरांचं औषध! वर्‍हाड निघालं उत्तरेला!

संदीप रोडे

नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी साई समाधी शताब्दी सोहळ्यानंतर आता साईसमाधी दर्शनरांगेच्या उद्घाटनानिमित्त 26 ऑक्टोबरला दुसर्‍यांदा शिर्डीत येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगर येथे आयोजित नियोजन बैठकीत दक्षिणेतील भाजप नेत्यांच्या मनातील मळमळ बाहेर आली. आजी-माजी आमदारांनी विखेंच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. विखे काँग्रेसमध्ये असताना आणि नंतर त्यांच्या भाजप प्रवेशापासून विरोधाचे पालुपदच त्यांच्याशी जोडले गेले आहे.

दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टातही हा वाद पोहोचल्याचा इतिहास ताजा आहे. आ. राम शिंदे यांनी तर जाहीरपणे विखेंवर शरसंधान साधत लोकसभा उमेदवारीची हाळी दिल्याचे नगरकर अजूनही विसरलेले नाहीत. विखे-शिंदे वादाची संभावना फडणवीस यांनी ‘पेल्यातील वादळ’ अशी करत त्यावर पडदा टाकला होता. विखे आणि पक्षांतर्गत वाद हा विखेंनाही नवा नाही. अनेक वेळेस विखेंविरोधात मोहिमा राबविल्या गेल्या, त्या-त्या वेळी डॉक्टर असलेले खासदार सुजय विखे यांनी त्या मोहिमा लीलया हाताळल्या अन् गुंडाळल्यादेखील!

‘सगळेच कार्यक्रम उत्तरेत. एखादा दक्षिणेतही घ्या,’ अशी खदखद व्यक्त करताना माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी सर्वप्रथम विखेविरोधाला तोंड फोडले. आ. राम शिंदे यांनी तर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, शासन आपल्या दारी, केंद्रीय मंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह अशा उत्तरेत झालेल्या 9 कार्यक्रमांची भाडळी मांडली. ‘उत्तरेतील कार्यक्रमाचे नियोजन नगरला होते. नगर दक्षिणचे वर्‍हाड उत्तरेत जाते, एखादा कार्यक्रम सिद्धटेकलाही घ्या,’ अशा शब्दात त्यांनी विखेंवर नेम साधला.

आ. मोनिका राजळे यांनीही या संधीचे सोने केले. ‘दक्षिणेत तीन आमदार (पाचपुते, राजळे, शिंदे) आणि खासदार असताना इकडेही कार्यक्रम होऊ द्या,’ अशी अपेक्षा व्यक्त केली. आजी-माजींची मागणी ऐकताच, मंत्री विखे पाटील यांनी ‘जिल्हा बँकेच्या निमित्ताने कार्यक्रम नगरला घेऊ, केंद्रीय मंत्री अमित शहा यांना आणू,’ असे सांगून वेळ निभावून नेली.

‘विखे’ नावच काफी (!) हे नगरच काय, राज्यातील दिग्गजांनाही ठाऊक. त्यांच्या राजकीय डावपेचांचा थांगपत्ता कोणाला कधी लागतच नाही. रात्रीतून ‘आदेश’ निघतात, यंत्रणा कामाला लागते, अशी चर्चा नेहमीच होते. भाजपात प्रवेश केल्यानंतर आमदार म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली अडीच वर्षे विरोधी बाकावर काढले. पुढे सत्तांतरनाट्यानंतर आलेल्या महायुती सरकारमध्ये पहिली शपथ घेत महसूलमंत्री पदावर बाजी मारली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सत्तेतील एन्ट्रीनंतर विखेंच्या महसूल मंत्रिपदावर टांगती तलवार येण्याची चर्चा असतानाही विखेंनी ती परतावली अन् खाते शाबूत ठेवले.

जिल्हा नामांतर अन् आता आरक्षणाच्या मुद्द्यावर विखे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न झाला, पण तोही त्यांनी लीलया पेलला. कोणत्याही पक्षात असो, ‘हॉटलाईन’ हा विखेंचा स्थायी भाव. पण हीच तर विखेंची खरी अडचण असल्याचे भाजपवालेच खासगीत सांगतात. नगर जिल्ह्यातील तीन अध्यक्षांची निवड झाल्यानंतर जाहीर झालेल्या भाजपच्या दक्षिण, शहर कार्यकारिणीवर नजर टाकल्यास विखेंनी भक्कमपणे पाय रोवल्याचे दिसून येते. संघटनेवर पकड घेण्यासोबतच ‘यंत्रणा’ ही विखेंची जमेची बाजू. आता होऊ घातलेल्या लोकसभेची तयारी विखेंकडून सुरू आहे. उमेदवारीबाबत विद्यमान खासदार असलेले डॉक्टर तोलूनमापून बोलतात.

तरीही पक्षांतर्गत खदखद बाहेर येतेच कशी? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. संपर्कक्षेत्राबाहेर असल्याचे खासदार विखे प्रांजळपणे कबूलही करतात, पण विकासकामांच्या माध्यमातून मनामनात असल्याचेही ते ठासून सांगतात… किती हा मोठेपणा! मविआचा उमेदवार ठरला नसला तरी ‘ते नाव’ हेरून ‘लंकादहन’ करण्याची एकही संधी खा. विखे सोडत नाहीत. याचसोबत 1991ची पुनरावृत्ती होणार नाही, याचीही दक्षता ते घेत असल्याचे दिसून येते. किती मोठी प्रगल्भता!!

आता पंतप्रधान येणार म्हटल्यावर सगळ्याच ‘ट्रिक’ वापराव्या लागतात. विखे त्यात कमी पडत नाहीत. त्यामुळेच होम ग्राउंड असलेल्या शिर्डीकडे त्यांचा कल असतो. विखेंचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ अफलातून असते. मग ते कशाचेही असो. ‘बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती है’ या पिक्चरमधील डायलॉगप्रमाणे ‘मळमळ काय, ती तर होणारच,’ त्यावर खासदार डॉक्टरांकडे ‘जालीम औषध’ आहेच.
असे छोटे-मोठे विकार बरे करण्यात खासदारांचा हातखंडा निश्चितच असल्याचे आजवर दिसून आलेच की. आता विखे पाटील दक्षिणेत ‘मोठ्ठा कार्यक्रम’ करतील अन् शब्द पाळतील, ही अपेक्षाही करायला काहीच हरकत नाही. फक्त तो ‘कार्यक्रम’ कोणाचा होईल, हे आज तरी गुलदस्त्यातच आहे.

शिंदेंचे स्टेअरिंग लंकेंच्या हाती!

पक्षांतर्गत खदखदीला वाट मोकळी केल्यानंतर 24 तासांतच आ. राम शिंदे यांच्या गाडीचे स्टेरिंग राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्या हाती पाहून जिल्ह्यात चर्वितचर्वण सुरू झाले नसते तरच नवल होते… राष्ट्रवादीची शकले उडण्यापूर्वी आ. लंके हे मविआचे संभाव्य उमेदवार होते, आता मात्र त्याविषयी शंका व्यक्त होते. पण लंके हे विखेंचे राजकीय विरोधक असल्याचे यांच्यातील वाक्युद्धावरून अनेकदा दिसते. अर्थातच लंके-पवार जवळिकीमुळे विखे सावध भूमिकेत दिसतात. आता त्याच लंकेंसोबत आ. राम शिंदेंची देवदर्शनाची वारी एकाच गाडीतून, तेही शिंदेच्या गाडीचे सारथ्य लंकेंच्या हाती, हे चित्र खूप काही सांगून जाते. विखेंचे लक्ष या चित्राने वेधले नसेल, असे कसे म्हणता येईल…

हेही वाचा

नाशिक : खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बाजीराव सूर्यवंशी

Nashik Crime : त्याच हुक्का पार्लरवर दुसऱ्यांदा छापा

Jammu Accident : जम्मू-श्रीनगर महामार्गावर अपघात; चार जणांचा मृत्यू

Back to top button