नगर महापालिकेने लाथाडले चार कोटी ; निधी गेला परत | पुढारी

नगर महापालिकेने लाथाडले चार कोटी ; निधी गेला परत

सूर्यकांत वरकड

नगर : शौचालय नसल्याने नगर शहरात महिलांची होत असलेली कुचंबना आणि असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झालेली असतानाच महापालिकेने त्यासाठी आलेल्या चार कोटींचा निधी लाथाळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आलेला चार कोटी रुपयांचा निधी केवळ आणि केवळ महापालिकेच्या उदासीनतेमुळे माघारी गेला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीसाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. त्यातील चार कोटींच्या निधीतून शौचालय उभारण्याची तरतूद होती. तत्कालीन उपायुक्त यशवंत डांगे यांची बदली झाल्यानंतर घनकचरा विभागाचा पदभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांच्याकडे सोपविण्यात आला. तर, घनकचरा विभागाचे प्रभारी प्रमुख किशोर देशमुख यांच्या देण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

स्वच्छ भारत अभियानाच्या निधीसंदर्भात आढावा बैठकीसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे मुंबई येथे बैठकीसाठी गेले होते.तिथे गेल्यानंतर उपायोगिता प्रमाणपत्रात तफावत आढळून आल्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचार्‍याला फोन केला असता स्वच्छ अभियानाच्या चार कोटीचा विषय चर्चेला समोर आला. संबंधित कर्मचार्‍याला ते पैसे कोठे खर्च झाले हे सांगता आले नाही. प्रत्यक्षात ते पैसे खर्चच झाले नाहीत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीसाठी आलेला निधी महापालिकेच्या उदासिनतेमुळे परत गेला.
दरम्यान, आयुक्तांनी विभागप्रमुखासह दोघांवर कारवाई प्रस्तावित केली होती. त्याचे पुढे काय झाले ते समोर आले नाही. उलट संबंधित कर्मचार्‍याला दुसर्‍या विभागाची जबादारी सोपविण्यात आली.

दुसरीकडे शहरात महापालिकेचे कोणतेच सार्वजनिक शौचालय सुस्थितीत नाही. महिलांसाठी व्यवस्था असूनही महिला तिथे जाऊ शकत नाही अशी अवस्था आहे. कापड बाजारात खरेदीसाठी येणार्‍या महिलांना शौचालयाची व्यवस्था नाही. तर, कापड बाजारात महिला व्यावसायिकांनाही शौचालयाची व्यवस्था नाही, अशी परिस्थिती असताना महापालिकेचा स्वच्छ भारत अभियांनाचा निधी परत जातो. याला महापालिकेचा गलथान कारभार जबाबदार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

कर्मचार्‍याकडून माहिती देण्यास टाळाटाळ
घनकचरा विभागाकडील स्वच्छ भारत अभियानांतर्गत आलेला चार कोटींचा निधी नेमका कुठे खर्च झाला. याबाबत घनकचरा विभागातील एका कर्मचार्‍याकडे दैनिक पुढारीच्या बातमीदाराने माहिती मागितली. अतिरिक्त आयुक्तांनी ती माहिती द्या, असे सांगून संबंधित कर्मचार्‍याने माहिती दिली नाही.

स्वच्छ भारत अभियानाचा चार कोटींचा निधी परत गेला. ही गंभीर बाब आहे. यासंदर्भात उद्या माहिती घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
                                                           – रोहिणी शेंडगे, महापौर

शहरात विविध ठिकाणी आज शौचालयाची गरज आहे. मात्र, स्वच्छ भारत अभियानांतर्गत आलेला निधी जर परत जात असेल तर दुर्दैवी गोष्ट आहे. याबाबत जबाबदार कर्मचार्‍यांची चौकशी होणे गरजेचे आहे.
                                                               – संपत बारस्कर, विरोधी पक्षनेते मनपा

Back to top button